आमदार राजेश फळदेसाई यांची मागणी
जुने गोवे ( वार्ताहर)-
धावजी जुने गोवा येथे शनिवारी प्रथमच पर्यटन विभागाच्या अधिकृत व्हिवा सांजाव फेस्टिव्हलचे यशस्वी आयोजन केल्यानंतर, कुंभारजुवें मतदारसंघाचे आमदार आणि गोवा पुनर्वसन मंडळाचे अध्यक्ष राजेश फळदेसाई यांनी प्रसिद्ध सनबर्न फेस्टिव्हल मतदारसंघात आयोजित करण्याची मागणी केली.
व्हिवा सांजाव महोत्सवाचे आयोजन पर्यटन विभागाकडून अतिशय चांगल्याप्रकारे आयोजित करण्यात आले. पर्यटनमंत्री रोहन खवटे आणि आम्ही हा महोत्सव धावजी जुने गोवे येथे आयोजित करण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. आमच्या मतदारसंघात असे कार्यक्रम नियमितपणे आयोजित केले तर आमच्या लोकांना आनंद वाटेल. सनबर्न फेस्टिव्हलचेही येथे आयोजन केले आहे, असे फळदेसाई म्हणाले.
सांजाव महोत्सवासाठी 48 तासांत ही जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल आपण तडफदार आमदार राजेश फळदेसाई यांचे आभार मानतो. कुंभारजुवे मतदारसंघाचा जास्तीत जास्त विकास होईल आणि तो मानवी विकास आणि पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने लोकांपर्यंत पोहोचेल याची आम्हाला खात्री आहे असे मंत्री रोहन खंवटे म्हणाले.

गोवा समुद्रकिनाऱ्यांच्या पलिकडे आहे. आमची गावे सुंदर आहेत, इथले आदरातिथ्य जगाने हे अनुभवण्याची गरज आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना फक्त गोव्याच्या कार्निव्हल आणि शिमगोत्सवाची माहिती आहे. मुख्यमंत्री प्रमोद यांच्याशी चर्चा करून गोव्यातील प्रत्येक ठिकाणी उत्सव घेण्याचे ठरवले आहे. ज्या बचत गटांना आणि उद्योजकांना व्यवसाय करण्याची संधी हवी आहे त्यांना अशा कार्यक्रमांचा फायदा घेतला पाहिजे. पुढच्या आठवड्यात आम्ही माशेलमध्ये चिखलकाल्याचे आयोजन करत असल्याचे मंत्री खवटे यांनी सांगितले.
सांजाव महोत्सवात विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या तसेच गोयची पारंपरिक सान्ना, पातोळ्यो खवय्यांसाठी उपलब्ध होत्या. मंत्री रोहन खवटे व आमदार राजेश फळदेसाई यांनी डोळ्यांवर पट्टी बांधून मडके फोडण्याचा आनंदही घेतला. मतदारसंघातील नागरिकांनी तसेच पर्यटकांनी सुद्धा सांजाव महोत्सवात मनसोक्त आनंद लुटला.









