रशियात गृहयुद्धाची स्थिती : खासगी लष्करी गट ‘वॅगनर समूह’ आक्रमक : शरणागती पत्करण्यास नकार
वृत्तसंस्था/ मॉस्को
युव्रेनविऊद्ध सुरू असलेल्या युद्धात रशियाच्या बाजूने लढत असलेल्या खासगी लष्करी गट ‘वॅगनर समूहा’ने आता रशियाविऊद्धच बंड केल्याची माहिती समोर येत आहे. ‘वॅगनर समूहा’चे प्रमुख येवगेनी प्रिगोझीन यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याविरोधात बंडाची घोषणा केली आहे. प्रिगोझीनने रोस्तोव्हमधील रशियन सैन्याचे दक्षिणी लष्करी मुख्यालय आणि व्होरोनेझ शहरातील लष्करी तळ ताब्यात घेतल्याचा दावा केला. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी देशाला संबोधित करताना देशद्रोहाचा आरोप करत कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. तर, ‘ही सशस्त्र बंडखोरी नसून न्यायाच्या दिशेने चाललेली वाटचाल आहे,’ असा प्रतिवार प्रिगोझीन यांनी केला आहे.
येवगेनी प्रिगोझीनने स्वत: रोस्तोव्हमधील रशियन सैन्याच्या मुख्यालयात असल्याचा दावा केला. त्यानंतर आता वॅगनरचे लढाऊ सैन्य आणि युद्धसामुग्री मॉस्कोच्या दिशेने चाल करून जात असल्यामुळे मॉस्कोकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, मॉस्कोमध्ये दहशतवादविरोधी आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. रशियाची राजधानी मॉस्को आणि आर्थिक राजधानी सेंट पीटर्सबर्गमध्ये प्रचंड सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, रोस्तोव्ह-ऑन-डॉननंतर वॅगनरने आता व्होरोनेझच्या लष्करी तळावर दावा केला आहे. मॉस्कोच्या रस्त्यांवर रणगाडे आणि मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. व्होरोनेझ शहर रोस्तोव्ह आणि मॉस्को दरम्यान आहे. व्होरोनेझमधील तेल तळ उद्ध्वस्त झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पुतीन यांनी केली मोठी चूक : वॅगनर प्रमुख
रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात आघाडी उघडणारे वॅगनरचे प्रमुख येवगेनी प्रिगोझीन यांनी पुतीन यांची फार मोठी चूक झाली असून आपण शरणागती पत्करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यापूर्वी पुतीन यांनी वॅगनर समूह प्रमुखांवर फसवणूक केल्याचा आरोप करत कारवाईची धमकी दिली होती. राष्ट्रपतींनी आपल्यावर फसवणुकीचा ठपका ठेऊन मोठी चूक केली आहे. आम्ही देशभक्त असून आजपर्यंत त्यांच्यासाठीच लढत आहोत, असेही प्रिगोझीन पुढे म्हणाले.
लष्करी तळ ताब्यात
‘वॅगनर’च्या सैन्याने व्होरोनेझ शहरातील रशियन लष्कराच्या तळावर ताबा मिळवला आहे. रोस्तोव्हनंतर वॅग्नरने ताब्याचा दावा केलेले हे दुसरे शहर आहे. वॅगनरच्या तुकड्या आता राजधानी मॉस्कोकडे कूच करत आहेत. तथापि, व्होरोनेझ अधिकाऱ्यांनी अद्याप या दाव्याला पुष्टी दिलेली नाही. दरम्यान, शहराच्या राज्यपालांनी लोकांना खोट्या बातम्यांपासून सावध राहण्यास सांगितले आहे. रशियन सैन्य या भागात लष्करी कारवाई करत असल्याचे म्हटले आहे.
पुतीन यांच्यासमोर 22 वर्षांतील सर्वात गंभीर आव्हान
रशियातील स्फोटक परिस्थितीबाबत तज्ञांचे म्हणणे आहे की, हे रशियन नेतृत्वासमोरील अत्यंत गंभीर आव्हान आहे. पुतीन यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर हे सर्वात मोठे आव्हान असल्याचे संरक्षण तज्ञांचे म्हणणे आहे. पुतीन यांनी 22 वर्षांपूर्वी सत्ता हाती घेतल्यापासून हे देशांतर्गत बंड त्यांचे सर्वात मोठे संकट बनले आहे. आता आयुष्यातील सर्वात भयावह संकटाचा सामना त्यांना करावा लागत असून नजिकच्या काळात देशातील स्थिती अत्यंत गंभीर होण्याचा धोकाही वर्तवला जात आहे.
रशियातील परिस्थितीवर जगाचे लक्ष
रशियात उठाव करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच आता साऱ्या जगाच्या नजरा रशियावर खिळल्या आहेत. रशियातील संपूर्ण परिस्थितीवर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत, असे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सांगितले. तसेच आम्ही युव्रेनला मदत करत राहू असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे पोलंडच्या राष्ट्राध्यक्षांनीही आपण रशियातील उठावावर लक्ष ठेवून असल्याचे म्हटले आहे. पोलंड हा रशियाचा शेजारी देश असून युव्रेनचा सर्वात मोठा मदतनीस आहे.









