वृत्तसंस्था इस्लामाबाद
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची 37 वर्षे जुन्या लाच प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लाहोर येथील एका न्यायालयाने या प्रकरणाचा निर्णय शनिवारी दिला. शरीफ यांनी अत्यंत महागडा सरकारी भूखंड एका वृत्तसंस्थेला लाच म्हणून हस्तांतरित केला होता, असा आरोप होता.
नवाझ शरीफ यांना सार्वजनिक पद हाती ठेवण्यास अपात्र ठरविण्याचा निर्णय 2018 मध्ये पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यामुळे ते राजकीय अज्ञातवासात गेले होते. तथापि, काही दिवसांपूर्वी त्याचे कनिष्ठ बंधू आणि सध्याचे पंतप्रधान शहाबाझ शरीफ यांनी कायद्यात बदल करुन अपात्र ठरविण्यात आलेल्या राजकारण्यांना पुन्हा राजकारणात येता येईल अशी तरतूद केली आहे. त्यानंतर दोनच दिवसांनी हा नवा निर्णय आला असून आता शरीफ हे राजकारणात सक्रीय होण्याची शक्यता वाढली आहे. सध्या नवाझ शरीफ हे ब्रिटनमध्ये परागंदा राजकारणी म्हणून वास्तव्यास आहेत. ते पाकिस्तानात परतण्याची शक्यता आहे.