लोणावळा : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर खंडाळा घाटातील अंडा पॉईंट येथील वळणावर भरधाव वेगातील कंटेनरने समोरून जाणाऱ्या दोन पिकअपला धडक दिली. त्यानंतर हा कंटेनर एका पिकअपवर पलटी झाला. या भीषण अपघातात पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका शाळकरी मुलाचा समावेश आहे. आज सकाळी हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कंटेनर भरधाव वेगाने लोणावळय़ातून मुंबईच्या दिशेने निघाला होता. अंडा पॉईंट येथील उतार व वळणावर चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने त्याने दोन पिकअपला धडक दिली. त्यानंतर हा कंटेनर एका पिकअपवर पलटी झाला. यावेळी पिकअप चालकाचा गाडीमध्ये अडकल्याने मृत्यू झाला तर जखमी दोघांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची देवदूत यंत्रणा व खोपोली येथील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी रेस्क्यू करत बाहेर काढत उपचारासाठी दाखल केले. अपघाताची माहिती समजल्यानंतर बोरघाट पोलीस यंत्रणा, खोपोली पोलीस, आय आर बी, यांच्यासह विविध यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला करत पिकअप गाडी व आतमध्ये अडकलेला चालक यांना बाहेर काढले.









