आयएमए फोंडा व माधवराव ढवळीकर ट्रस्टतर्फे आयोजन: 35 ते 65 वयोगटातील स्त्रियांनी लाभ घ्यावा -मंत्री सुदिन ढवळीकर यांचे आवाहन
मडकई : आयएमए फोंडा चॅरिटेबल ट्रस्ट व माधवराव ढवळीकर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने फर्मागुढी येथील दिलासा इस्पितळात आज शनिवार दि. 24 रोजी सकाळी 9 वाजता स्तन कर्क रोगाची मोफत प्राथमिक चाचणी केली जाईल. स्त्रियांना होत असलेल्या स्तन कर्क रोगाचे प्रमाण वाढत आहे. लाजाळू वृत्तीमुळे स्त्राrया स्तन कर्क रोगाची प्राथमिक चाचणी करुन घेण्यास तयार नसतात. मात्र काळाची पाऊले ओळखून 35 ते 65 वयोगटातील महिलांनी सक्तीने प्राथमिक चाचणी करुन घेण्याचे आवाहन वीजमंत्री तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी केले आहे. कवळे येथील कवळे पंचायत सभागृहात पंचायतीतर्फे शालेय साहित्य, शिष्यवृत्ती व माधवराव ढवळीकर ट्रस्टतर्फे फुल विक्रेत्यांना छत्र्यांचे वाटप करण्याच्या कार्यक्रमात मंत्री ढवळीकर बोलत होते. यावेळी कवळे जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, सरपंच मनुजा नाईक, उपसरपंच सुशांत कपिलेश्वरकर, माधवराव ढवळीकर ट्रस्टचे विश्वस्त मिथील ढवळीकर, पंचसदस्य प्रिया डोईफोडे, सोनाली तेंडूलकर, सत्वशिला नाईक, सुमित्रा नाईक, विठोबा गावडे, सर्वेश आमोणकर, योगेश कवळेकर, आडपईच्या माजी सरपंच क्षिप्रा आडपईकर, बांदोडा पंचसदस्य वामन नाईक आदी व्यासपिठावर उपस्थित होते. गेल्या दोन महिन्यापुर्वी तळावलीत माधवराव ढवळीकर ट्रस्टतर्फे महिला मेळाव्यात तज्ञ डॉक्टर्सना प्राचारण करुन या विषयांवर जागृती घडवून आणली होती. या रोगाची गंभीरता लक्षात घेऊन प्राथमिक चाचणी ही सुरुच ठेवण्याचे निश्चीत केले आहे. परिस्थिती बिकट असल्यास प्राथमिक चाचणी करण्यास स्त्रियांना वाहतुकीची सुद्धा सोय केली जाईल, असे पूढे बोलताना मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.
कचऱ्यापासून गॅसच्या निर्मितीसाठी 500 मिटर जमीन द्या- ढवळीकर
पंचायत क्षेत्रात होणाऱ्या कचऱ्यापासून गॅसची निर्मिती करण्यासाठी पंचायतीने 500 मिटरचा भूखंड मिळवून दिल्यास अनेक प्रश्न मार्गी लागू शकतील. माधवराव ढवळीकर ट्रस्टतर्फे घटप्रभा, बेळगांव व खानापूर आदी ठिकाणी एकुण 350च्या वर नर्सीस तयार केल्या असून त्यांना नोकऱ्या मिळवून देण्याचे काम त्यांच्या हातून घडलेले असल्याची माहिती त्यांनी दिली. तळागाळातल्या सामान्य माणसाला ट्रस्टच्या माध्यमातून डॉक्टर अभियंते बनवून त्यांना नोकऱ्या दिल्या. याचा आपल्याला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. सोशल मिडीयावरुन नकारात्मक टीकेतून विध्वंसकात्मक करण्यापेक्षा सकारात्मक टीकेतुन रचनात्मक कार्य करा. सकारात्मक टीकेतून समाज घडत असतो.
राज्यात महत्त्वाचे प्रकल्प राबविणाऱ्या मंत्री ढवळीकरांचे अभिनंदन…!
2002 साली माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रिकर यांच्या कार्यकाळात सार्वजनीक बांधकाम मंत्री असताना ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते हॉटमिक्स डांबरीकरण केले. राज्यातील ग्रामीण भागातील रस्ते हॉटमिक्स केल्यामुळे भारत देशातला पहिला मंत्री असल्याचा मान मंत्री सुदिन ढवळीकरांना प्राप्त झाला. भारत देशातला पहिला मलनिस्सारण प्रकल्प ग्रामीण भागात राबवून जनतेचे राहणीमान उंचावले, आणि गोवा मुक्ती नंतर सर्व जुन्या वीज वाहीन्या बदलून ग्रामीण भागात कमी व उच्च दाबाच्या भूमिगत वाहीन्या घालून वीज क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवून आणणाऱ्या मंत्री ढवळीकर यांचे खास अभिनंदन त्यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. गणपत नाईक यांनी मंत्री ढवळीकर यांनी सर्वच क्षेत्रात अभिमानास्पद कार्य केलेले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी केलेल्या विकासाची मांदीयाळी वाचून संपणार नाही असे सांगितले. मिथील ढवळीकर यांनी सांगितले ट्रस्टतर्फे अनेक उपक्रम राबविले जातात. उनपावसाचा मारा सहन करीत असलेल्या फुल, फळे विक्रेत्या रस्त्याच्या अथवा मंदिराच्या बाजूला बसून व्यवसाय करीत असतात. त्यांचा व्यवसाय तेजीत चालण्यासाठी त्यांना छत्र्यांची व्यवस्था केलेली आहे. यावेळी कवळे पंचायत क्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व लोकविश्वास प्रतिष्ठानच्या या सर्व विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, शिष्यवृत्त्या व फुल, फळे विक्रेत्यांना छत्र्यांचे वाटप मंत्री ढवळीकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत मनुजा नाईक यांनी केले. सूत्रसंचालन मयुर गावंस तर सोनाली तेंडूलकर यांनी आभार मानले.









