नाईक कुटुंबियांचे घर पुन्हा लक्ष्य. धोकादायक उतरणीच्या वळणावर वाहनाचा सुटला ताबा. चालक होता मद्यधुंद अवस्थेत. सुदैवाने जिवीतहानी नाही
डिचोली : डिचोली ते साखळी या महामार्गावर विठ्ठलापूर कारापूर येथील पारंपारीक अपघात घडण्याच्या ठिकाणी गुऊवारी मध्यरात्री पुन्हा अपघात घडला आणि नाईक कुटुंबियांचे घर पुन्हा अपघाताचे लक्ष्य बनले. धोकादायक उतरणीच्या वळणावर कर्नाटक नोंदणीकृत ट्रेक्स वाहनाच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने गाडी थेट नाईक कुटुंबियांच्या घराच्या मागच्या भागास धडकली व घराबाहेर स्थिरावली. या घटनेत गाडीमधील प्रवासी सुखरूप बचावले. सदर घटना गुरू. दि. 22 जून रोजी मध्यरात्री दिड वा. च्या सुमारास घडला. डिचोली येथून साखळीच्या दिशेने भरधाव वेगाने जाण्राया केए 28 पी 0259 या प्रवासी ट्रेक्स जीपच्या चालकाचा गाडीवरील विठ्ठलापूर येथे उतरणीच्या धोकादायक वळणावर पोहोचताच ताबा सुटला व जीप थेट नाईक यांच्या घराच्या मागील भागाला धडकली. तेथून पुढे असलेल्या लहानशा आंब्याच्या झाडाला धडकत ती रस्त्याच्या शेजारी असलेल्या दगडांमध्ये स्थिरावली. त्यामुळे आतील प्रवाशांना कोणत्याही प्रकारची गंभीर दुखापत झाली नाही. जर सदर गाडी घराला धडकून भरधावपणे पुढे गेली असती तरी भीषण अपघात घडून जिवीतहानीही ओढावली असती. असे या भागातील लोकांनी सांगितले. हे वळण धोकादायक असून गेल्या दोन वर्षांत या वळणावर अशा प्रकारचे हे तीन भीषण अपघात घडले आहेत. अशा या अपघातांमुळे घराची पार दुर्दशा झाली आहे. हे अपघात रोखण्यासाठी काहीतरी उपाययोजना करण्याची मागणी या भागातील लोकांकडून तसेच स्थानिक रहिवासी अनंत फातर्फेकर यांनी केली आहे.









