अधिकाऱ्यांच्या वाहनांचाच अडसर : दुर्लक्षपणामुळे नाराजी
बेळगाव : जिल्ह्यातील कोणतीही समस्या असली तरी जिल्हा पंचायतकडे तक्रार करण्यात येतात. त्यामुळे या ठिकाणी मोठी वर्दळ असते. दरम्यान, या ठिकाणी वारंवार वर्दळ होत असली तरी काही अधिकारी या ठिकाणी आपली वाहने पार्किंग करत असल्याने वाहतूक कोंडीत मोठी भर पडत आहे. त्यामुळे वाहनचालकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा पंचायत कार्यालयासमोरच वाहने पार्किंग करण्यात येत असून याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आता तरी अधिकाऱ्यांनी कार्यालयासमोरील पार्किंग इतरत्र हलविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. बेळगाव शहरात प्रवेश करण्यासाठी न्यायालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हा पंचायत, खडक गल्लीवरून नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. मात्र या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या ठिकाणी अधिकाऱ्यांचीच वाहने पार्किंग केली जात आहेत. त्यामुळे वाहनचालकांना हटकले असता ते उलट नागरिकांनाच दमदाटी करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा पंचायतच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय सध्या वाहतूक कोंडीच्या कचाट्यात अडकत आहे. येथील रस्ता कामांमुळे मोठी समस्या निर्माण झाली असून ही कामे संथगतीने सुरू असल्यामुळे नागरिकांना व वाहतूकदारांना याचा मोठा फटका बसत आहे. परिणामी या कामांना गती देऊन येथील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली असतानाच आता जिल्हा पंचायतीसमोरही अशीच परिस्थिती निर्माण होत आहे. कार्यालयासमोरच वाहने पार्किंग करण्यात येत असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हा पंचायतकडे जाणारा रस्ता याचबरोबर वाचनालयाकडून येणाऱ्या रस्त्यावर वाहने पार्किंग करण्यात येत आहेत. परिणामी याचा फटका येथे कामासाठी येणाऱ्या नागरिकांना बसत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करत या रस्त्याच्या कामासाठी कोणीच लक्ष देण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
अधिकाऱ्यांच्या वाहनांचा अडसर
जिल्हा पंचायत किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रस्ता तसेच नवीन इमारती उभे करण्यासाठी काम सुरू झाले आहे. जेसीबीच्या साहाय्याने रस्ता तसेच खुल्या जागेमध्ये खोदाई करण्यात आली होती. आता रस्त्याचे सर्व काम पूर्ण झाले आहे. मात्र काही ठिकाणी पेव्हर्स व इतर काम शिल्लक आहे. मात्र त्या ठिकाणी महसूल विभागातील एजंटांबरोबरच काही अधिकाऱ्यांची वाहनेही पार्किंग करण्यात येत असल्याने मोठी समस्या निर्माण होत आहे. ही वाहने संपूर्ण रस्त्याच्या दोन्ही बाजुला पार्किंग करण्यात येतात. जिल्हा पंचायतकडून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही वाहने पार्किंग करण्यात येत आहेत. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.









