बसपास घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट : जुन्या बसपासच्या मुदतीत 30 जूनपर्यंत वाढ
बेळगाव : शैक्षणिक बसपास प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. मात्र विद्यार्थ्यांचा प्रतिसाद थंडावलेला पहायला मिळत आहे. जुन्या बसपासची मुदत 30 जून रोजी संपणार आहे. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना नवीन बसपास काढणे आवश्यक आहे. यंदा मुलींना मोफत बस प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे केवळ विद्यार्थी बसपास काढणार आहेत. परिणामी यंदा बसपास घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होणार आहे. त्यामुळे परिवहनचेदेखील आर्थिक नुकसान होणार आहे. शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला की, बसपास प्रक्रियेला प्रारंभ होतो. यंदादेखील शैक्षणिक वर्षाबरोबर बसपास प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांनी बसपास मिळविण्याकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे. मात्र वेळेत बसपास काढणे आवश्यक आहे. अन्यथा 30 जूननंतर तिकीट काढून प्रवास करावा लागणार आहे. प्राथमिक, माध्यमिक आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी बसपास प्रक्रिया सुरू आहे. शिवाय कर्नाटका वन आणि ग्रामवनमध्येदेखील ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
केवळ विद्यार्थ्यांनाच बसपास काढावा लागणार
बेळगाव विभागातील चार आगारासह खानापूर, रामदुर्ग, सौंदत्ती या आगाराचा समावेश आहे. एकूण 7 आगारांमध्ये 76 हजारहून अधिक विद्यार्थी बसपास काढतात. मात्र यंदा महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थिनींना मोफत बस प्रवासाची मुभा उपलब्ध आहे. त्यामुळे केवळ विद्यार्थ्यांनाच बसपास काढावा लागणार आहे. त्यामुळे यंदा बसपास घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतदेखील घट होणार आहे. त्यामुळे परिवहनला आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे.
सेवासिंधू पोर्टलवर अर्ज
मागील दोन वर्षात बसपास प्रक्रिया पूर्णपणे बदलली आहे. विद्यार्थ्यांना सेवासिंधू पोर्टलवर अर्ज करावा लागत आहे. त्यानंतर अर्जाची छाननी होऊन बसपास उपलब्ध होत आहे. या प्रक्रियेला आठवडाभराचा कालावधी लागत आहे. दरम्यान विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जुन्या बसपासची मुदत 30 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. या कालावधीत नवीन बसपास काढणे आवश्यक आहे.









