विंडीज दौऱ्यासाठी भारताचा कसोटी, वनडे संघ जाहीर
रोहितकडे नेतृत्व कायम, कसोटीत रहाणे वनडेत हार्दिक पंड्या उपकर्णधार, उमेश यादव, शमी संघाबाहेर
वृत्तसंस्था/ मुंबई
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने शुक्रवारी टीम इंडियाची घोषणा केली. कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत रोहित शर्माच संघाचं नेतृत्व करेल. रोहितला विश्रांती देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा होती. पण, रोहितकडे संघाचे नेतृत्त्व देऊन बीसीसीआय त्याच्यावर मोठा विश्वास टाकला आहे. अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला मात्र कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. तर अजिंक्य रहाणेला बढती देण्यात आली असून त्याच्याकडे कसोटी मालिकेसाठी उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान, उभय संघात दोन कसोटी, तीन वनडे व पाच टी-20 सामने खेळवण्यात येणार आहेत. कसोटी मालिकेला 12 जुलैपासून सुरुवात होईल. दरम्यान, टी-20 संघाची घोषणा नंतर करण्यात येणार असल्याची माहिती बीसीसीआयमधील सूत्रांनी दिली आहे.

भारतीय क्रिकेट निवड समितीने दोन्ही मालिकांसाठी संतुलित संघांची निवड केली आहे. या संघांमध्ये अनुभवी आणि युवा खेळाडूंना सधी देण्यात आली आहे. तर तीन दिग्गजांना विश्रांती दिली आहे. कसोटी संघातून चेतेश्वर पुजारा, उमेश यादव आणि मोहम्मद शमीला विश्रांती दिली आहे. तर ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी आणि इशान किशनला 16 सदस्यीय संघात संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मुंबईकर युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांना प्रथमच कसोटी संघात स्थान मिळाले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी यशस्वी जैस्वालला स्टँडबाय म्हणून ठेवण्यात आले होते.
इशान किशनने अद्याप कसोटी पदार्पण केलेले नाही. या दौऱ्यात त्याची प्लेईंग इलेव्हनमध्ये वर्णी लागू शकते. इशानला एकदिवसीय आणि कसोटी अशा दोन्ही संघांमध्ये स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, उमेश यादवला वनडे आणि कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. याशिवाय, दिग्गज गोलंदाज आर.अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल यांच्यावर फिरकीची धुरा असणार आहे.
जैस्वाल, गायकवाड प्रथमच कसोटी संघात
यंदाच्या आयपीएल हंगामात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या मुंबईकर यशस्वी जैस्वालला कसोटी संघात स्थान मिळाले आहे. यशस्वीने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला भारतीय संघात संधी देण्यात आली, असे म्हटले जात आहे. पण यशस्वीने मुंबईकडून खेळताना स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे यशस्वी हा फक्त मोठी फटकेबाजी करत नाही तर त्याच्याकडे चांगला बचावही आहे आणि कसोटी क्रिकेटमध्ये या गोष्टीची सर्वात जास्त गरज असते. आता भारतीय संघात पुजाराला संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्याच्या जागी आता तिसऱ्या स्थानावर यशस्वीला संधी मिळू शकते. यशस्वी जैस्वालसह आणखी महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडला संघात स्थान मिळाले आहे. आयपीएलसह आता महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या गायकवाडने आपल्या कामगिरीने निवड समितीचे लक्ष वेधून घेतले आहे. या जबरदस्त कामगिरीचा त्याला फायदा झाला असल्याचे दिसून येत आहे.

अजिंक्य रहाणेचे यशस्वी कमबॅक
वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी रहाणेने तब्बल दीड वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन केले. पुनरागमनाच्या सामन्यात अजिंक्यने उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतले होतं. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने पहिल्या डावात 89 तर दुसऱ्या डावात 46 धावांची खेळी केली होती. या सामन्यात तो भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. तसेच यंदाच्या आयपीएलमध्येही त्याने जबरदस्त कामगिरी केली होती. हे त्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दमदार पुनरागमन पाहून बीसीसीआयने अजिंक्यला पुन्हा एकदा कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्त केले आहे.

कसोटीतून पुजाराचा पत्ता कट
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचे खेळाडू फ्लॉप झाले. कौंटीमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या चेतेश्वर पुजारालाही चांगली कामगिरी करता आली नाही. या खराब कामगिरीनंतर चेतेश्वर पुजाराला विंडीज दौऱ्यासाटी कसोटी संघात स्थान देण्यात आलेले नाही. बऱ्याच दिवसांपासून पुजारा आऊट ऑफ फॉर्म आहे. जानेवारी 2019 पासून गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्याने बांगलादेशविरुद्ध नाबाद 102 रन्सची खेळी केली. त्यावेळी ते पुजाराचे 1443 दिवसानंतरचे कसोटीमधील शतक होते. गेल्या पाच वर्षांत पुजाराच्या कामगिरीत चढ-उतार दिसून आलेत. यावेळी अनुभवाच्या जोरावर त्याला संधी मिळत राहिली. मात्र यावेळी टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात त्याच्या खराब फलंदाजीमुळे त्याला टीममधून वगळण्यात आल्याची चर्चा आहे.

वनडे संघात संजू सॅमसनचे पुनरागमन
आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या संजू सॅमसनचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे. निवड समितीने जरी संजू सॅमसनला संघात स्थान दिले असले तरी त्याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळणार का हा मोठा प्रश्न आहे. सलामीवीर ऋतुराज गायकवाड, वेगवान गोलंदाज जयदेव उनादकट आणि मुकेश कुमार, उमरान मलिक यांचीही वनडे संघात वर्णी लागली आहे. हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपदाची धुरा असणार आहे. यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, कुलदीप यादव या तीन फिरकीपटूंना स्थान देण्यात आले आहे.
विंडीज दौऱ्यासाठी कसोटी संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी.
विंडीज दौऱ्यासाठी वनडे संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर),
हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनादकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.
भारतीय संघाचे वेळापत्रक –
पहिली कसोटी – 12 ते 16 जुलै, डॉमिनिका
दुसरी कसोटी – 20 ते 24 जुलै, पोर्ट ऑफ स्पेन
पहिला वनडे सामना – 27 जुलै, ब्रिजटाउन
दुसरा वनडे सामना – 29 जुलै, ब्रिजटाउन
तिसरा वनडे सामना – 1 ऑगस्ट, पोर्ट ऑफ स्पेन
पहिला टी-20 सामना – 3 ऑगस्ट, पोर्ट ऑफ स्पेन
दुसरा टी-20 सामना – 6 ऑगस्ट, गयाना
तिसरा टी-20 सामना – 8 ऑगस्ट, गयाना
चौथा टी-20 सामना – 12 ऑगस्ट, फ्लोरिडा
पाचवा टी-20 सामना – 13 ऑगस्ट, फ्लोरिडा









