प्रतिनिधी/ बेंगळूर
विधानसभा निवडणुकीत हुबळी-धारवाड सेंट्रल मतदारसंघातून पराभूत झालेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून आले आहेत. त्याचप्रमाणे काँग्रेसचे उमेदवार मंत्री बोसराजू आणि तिप्पण्णप्पा कमकनूर हे देखील बिनविरोध निवडून आले आहेत. निवडणूक अधिकारी आणि विधानसभेच्या सचिव विशालाक्षी यांनी शुक्रवारी याबाबतची अधिकृत घोषणा केली.
माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, आर. शंकर आणि बाबूराव चिंचनसूर यांच्या राजीनाम्यामुळे विधानपरिषदेच्या तीन जागा रिक्त झाल्या होत्या. या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. मात्र, विधानसभेवरून विधानपरिषदेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत केवळ काँग्रेसच्या उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे शेट्टर, बोसराजू व तिप्पण्णप्पा यांची बिनविरोध निवड निश्चित झाली होती. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सायंकाळी या तिघांची बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले.









