वृत्तसंस्था / नवी दिल्ली
वीजदरांसंबंधी केंद्र सरकार लवकरच एक महत्वाचे धोरण घोषित करणार आहे. त्यानुसार दिवसा वीजदर कमी तर रात्री जास्त राहणार आहे. या नव्या प्रस्तावित नियमानुसार दिवसाच्या तासांमध्ये दरात 20 टक्क्यांपर्यंत कपात करण्यास वितरण मंडळांना अनुमती दिली जाईल. तर रात्रीच्या तासांमध्ये दर 20 टक्क्यांपर्यंत वाढविले जाऊ शकतात, असे केंद्रीय ऊर्जा विभागाने स्पष्ट केले आहे.
भारतात आता सौरऊर्जेचे प्रमाण वाढत आहे. सौरवीजेचा उपयोग अधिकाधिक व्हावा, यासाठी दिवसा वीजेचे दर कमी ठेवण्याची योजना आहे. तर रात्री सौरवीज अत्यल्प प्रमाणात उपलब्ध होते. त्यामुळे रात्री नेहमीची वीज अधिक उपयोगात आणली जाते. त्यामुळे रात्री वीजदर अधिक ठेवण्यावर विचार केला जात आहे. सौर वीज तुलनेने स्वस्त असते, हे देखील या निर्णयाचे एक कारण आहे.
2024 पासून नियम लागू होणार
हा नियम एप्रिल 2024 पासून प्रथम व्यापारी आणि औद्योगिक ग्राहकांसाठी लागू केला जाणार आहे. त्यानंतर एक वर्षाने तो कृषी क्षेत्र वगळता सर्व ग्राहकांसाठी लागू केला जाणार आहे. हा नियम लागू झाल्यानंतर 2030 पर्यंत भारतात सौरवीज क्षमतेचा उपयोग 65 टक्के इतक्या प्रमाणात होऊ शकेल, असा अंदाज आहे.









