अमेरिकेच्या संसदेत पंतप्रधान मोदींचा घणाघात, बायडेन यांच्याकडून शाही भोजन, अनेक मान्यवरांची उपस्थिती
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
‘दहशतवाद हा मानवतेचा सर्वात प्रबळ शत्रू असून त्याच्याविरोधात कोणतेही कारणे किंवा निमित्ते न सांगता सर्व देशांनी एकत्रितरित्या त्याविरोधात संघर्ष करणे आवश्यक आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या संसदेत केला. ते भारतीय प्रमाणवेळेनुसार शुक्रवारी रात्री दोन वाजता संसदेच्या संयुक्त बैठकीसमोर भाषण करीत होते. भाषणात त्यांनी भारत-अमेरिका संबंध, जागतिक घडामोडी, युक्रेन युद्ध, प्रशांत भारतीय क्षेत्रातील परिस्थिती, हरित ऊर्जा, पर्यावरण संरक्षण आणि विविध विषयांवर भारताची भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या या भाषणाला अमेरिकेच्या संसद सदस्यांनी जोरदार आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सध्याचे युग हे युद्धाचे नाही. ते चर्चेच्या मार्गाने आणि सामोपचाराने समस्या किंवा विवाद सोडविण्याचे आहे. युद्धामुळे जगाचा आर्थिक समतोल आणि पुरवठा साखळ्या विस्कळीत होतात. त्यामुळे युद्धे टाळली पाहिजेत. युद्धामुळे होणारा रक्तपात आणि माणसांना होणारा त्रास टाळण्यासाठी आपण सर्वांनी शक्य तितके सर्व प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन त्यांनी केले.
दहशतवाद झुगारुन द्या
अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आता दोन दशकांहून अधिक काळ लोटला आहे. तसेच भारतात मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यालाही आता दशकाहून अधिक काळ झाला आहे. मात्र, आजही दहशतवाद या ना त्या मार्गाने डोके वर काढीत आहे. आजही धर्मांधता आणि दहशतवाद हे धोके आपल्याला भेडसावीत आहेतच. जे देश दहशतवादाची जोपासना करतात त्यांना रोखणे हे आपले कर्तव्य आहे, असे स्पष्ट करत त्यांनी अप्रत्यक्षरित्या पाकिस्तानवर कोरडे ओढले. तसेच एकजुटीने हे संकट दूर केले पाहिजे, अशी सूचना केली.
भारताची प्रगती
आपण पंतप्रधान झालो तेव्हा, भारताची अर्थव्यवस्था जगात 10 व्या क्रमांकावर होती. आज 9 वर्षांनंतर ती 5 व्या क्रमांकावर पोहचली आहे. तर थोड्याच कालावधीत ती तिसऱ्या क्रमांकावर जाणार आहे. आमची अर्थव्यवस्था केवळ विस्तारत आहे असे नाही, तर वेगाने विस्तारत आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
सबका साथ…
भारताचे दृष्टीकोन स्पष्ट करताना त्यांनी सबका साथ, सबका विकास या सूत्राच्या आधारे आमची वाटचाल चालली असल्याचे स्पष्ट केले. आम्ही देशाच्या विकासासाठी पायाभूत सुविधांची बांधणी वेगाने करीत आहोत. आम्ही 15 कोटी लोकांसाठी 1 कोटी 40 लाख घरे बांधली आहेत. तसेच लोकांच्या मूलभूत आवश्यकता पुरविण्यासाठी अनेक योजना आणल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय लोकशाही भक्कम
भारतात लोकशाही भक्कम पायावर उभी आहे. विकासात सर्वांना सहभागी करुन घेतले जात आहे. भारताचा विकास करतानाच आम्ही जगाची स्थिरता आणि प्रगती यासाठीही प्रयत्न करीत आहोत. पर्यावरण संरक्षणासंबंधी आम्ही संवेदनशील आहोत आणि पर्यावरणस्नेही विकास साधत आहोत, असे प्रतिपादन त्यांनी केले.

भारत-अमेरिका संबंध
गेल्या 9 वर्षांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यात दृढ आर्थिक आणि धोरणात्मक संबंध प्रस्थापित झाले आहेत. कधी नव्हे, इतके आम्ही जवळ आलो आहोत. द्विपक्षीय व्यापारात मोठी वाढ झाली आहे. गुंतवणूक, तंत्रज्ञान हस्तांतरण, संरक्षण, इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश संशोधन आणि इतर सर्व क्षेत्रात एकत्र वाटचाल करण्याचा निर्धार आम्ही केला आहे, हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.
शाही भोजनासाठी मान्यवर उपस्थित
गुरुवारी रात्री अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन आणि त्यांच्या पत्नी डॉ. जिल यांनी व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदी यांच्यासाठी शाही भोजनाचे आयोजन केले होते. या भोजनासाठी मुकेश अंबानी, निता अंबानी, सुंदर पिचाई, आनंद महिंद्रा, इंद्रा नुयी, सत्य नाडेला, शंतनु नारायण, अमेरिकेच्या संसदेचे सभापती केव्हिन मॅकार्थी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच अमेरिकेचे व्यापार मंत्री गिना रैमांडो, परराष्ट्र व्यवहार मंत्री अँटोनी ब्लिंकन तसेच अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी आदी मुत्सद्दींनाही या भोजनाचे निमंत्रण देण्यात आले होते.
महत्त्वाचे करार
या दौऱ्यात अमेरिकेशी भारताने महत्त्वाचे करार केले आहेत. त्यात भारतीय युद्धविमान तेजससाठी भारतात इंजिने निर्माण करणे, भारताला एम क्यू 98 एचएएलई ड्रोन्स आणि अत्याधुनिक एम क्यू 9 रीपर ड्रोन्स पुरवणे, महत्त्वपूर्ण संरक्षण साधनांच्या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण, भारतात मायक्रोचिप्सची निर्मिती, अवकाश संशोधन सहकार्य, जैवतंत्रज्ञान सहकार्य, भारत-अमेरिका संरक्षण इकोसिस्टिम निर्माण करणे, शैक्षणिक सहकार्य, स्टार्टअप्स स्थापन करणे, संरक्षण क्षेत्रात नवी अत्याधुनिक शस्त्रे आणि साधने निर्माण करण्यासाठी सहसंशोधन, क्रिटिकल आणि इमर्जिंग टेक्नॉलॉजी पुढाकार, कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान संशोधन आदी असंख्य क्षेत्रांसंबंधीचे करार या दौऱ्यात करण्यात आले आहेत. एकंदर 12 मोठे करार झाले आहेत, अशी माहिती नंतर देण्यात आली आहे.
स्वाक्षरीसाठी झुंबड
संसदेतील भाषणानंतर पंतप्रधान मोदींची स्वाक्षरी घेण्यासाठी अमेरिकेच्या संसद सदस्यांची एकच झुंबड उडाली होती. जवळपास 100 संसद सदस्यांनी त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्याची माहिती नंतर देण्यात आली आहे. स्वाक्षरी घेणाऱ्यांमध्ये संसदेचे सभापती मॅकार्थी यांचाही समावेश होता. अनेक सदस्यांशी त्यांनी हस्तांदोलन केले.
15 वेळा स्टँडिंग ओव्हेशन, 79 वेळा टाळ्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकन संसदेतील भाषणाला उपस्थितांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याचे दिसून आले आहे. 62 मिनिटांच्या त्यांच्या भाषणातील महत्त्वाच्या वाक्यांना उपस्थित लोकप्रतिनिधींनी 15 वेळा उठून दाद दिली, तर तब्बल 79 वेळा त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केल्याचे दिसून आले.
‘टोस्ट’ विदाऊट अल्कोहोल
पंतप्रधान मोदी मद्यपान करीत नाहीत, याची जाणीव ठेवून अध्यक्ष बायडेन यांच्या शाही भोजनात पारंपरिक ‘टोस्ट’ कार्यक्रमात मद्य नव्हते. दोन्ही नेत्यांनी उंचावलेल्या पेल्यांमध्ये आल्याच्या रसाचे एक मद्य नसलेले पेय भरण्यात आले होते. पंतप्रधान मोदींना मद्याचा पेला हातात कसा धरायचा हे माहीत नाही, अशा अर्थाचा एक विनोद यावेळी बायडेन यांनी केला. त्याला पंतप्रधान मोदींनी आणि उपस्थितांनी हसून दाद दिल्याचे या कार्यक्रमात पहावयास मिळाले.
व्यापारविषयक वाद संपुष्टात
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार विषयक वाद संपुष्टात आणण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात घेण्यात आला. डब्ल्यूटीओ कराराअंतर्गत आयातीवरील करासंबंधात हे वाद होते. असे सहा वाद संपल्याचे तत्वत: मान्य करण्यात आले आहे. त्यानसंबंधीची मार्गदर्शक तत्वे लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहेत, अशी माहिती नंतर देण्यात आली आहे.
दौरा सफल झाल्याचे स्पष्ट
ड पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा अनेक अर्थांनी सफल झाल्याचे तज्ञांचे मत
ड युद्धविमानांचे इंजिन, अत्याधुनिक ड्रोन विक्री करार भारतासाठी अतिमहत्त्वाचे
ड तंत्रज्ञान हस्तांतरण, अवकाश सहकार्यासह अनेकविध विषयांवर झाले समझोते









