थंड हवेचे ठिकाण म्हणून परिचीत असलेल्या युरोपात प्रचंड उष्म्यामुळे वाळवंटांची संख्या वाढत आहे. जागतिक तापमानापेक्षा आर्क्टिक परिसरातील तापमान वाढ जगाच्या तुलनेत दुप्पट झाल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालातून दिसून आले. पोर्तुगाल, स्पेन, इटली, ग्रीस, सायरस, बल्गेरिया आणि रोमानियात वाळवंटांप्रमाणेच परिस्थिती निर्माण होत असल्याने तो एक सध्याला अतिशय चिंतेचा विषय बनला आहे.
युरोपातील वाढत्या उष्णतेमुळे हवेतील गारवा आटत चालला असून दुष्काळ
सदृश स्थिती निर्माण होऊ लागली. त्यामुळे अनेक युरोपियन देशांत जैवसृष्टी नष्ट झाल्याने जमिनीला भेगा पडलेल्या आहेत. जमिनीतील पाण्याच्या अभावामुळे इटलीतील एक लाख 68 हजार चौरस किलोमीटर आणि स्पेनमधील तीन लाख 65 हजार चौरस किलोमीटर जमिनीवरील हिरवळ नष्ट झाल्याने जमिनीला भेगा पडलेल्या आहेत. वाढत्या तापमानामुळे युरोपात वाळवंटांचा उदय होऊ लागलेला आहे. काळ्या समुद्रालगत असलेल्या देशांच्या दक्षिण भागांत वाळवंट निर्मितीची प्रक्रिया सुरु झालेली असून 2018 पासून या कठिण परिस्थितीवर मात करण्यासाठी युरोपियन युनियनमध्ये खल सुरु आहे.

पोर्तुगाल, स्पेन, इटली या देशांचा दक्षिणेकडील भाग, ग्रीस, माल्टा, सायरस या देशांचा आग्नेयेकडील भूभाग आणि बल्गेरिया तसेच रोमानियाच्या किनारपट्टीकडील जमीनीची प्रचंड प्रमाणात धूप होत असून त्याचा परिणाम म्हणून हा भाग वाळवंटी प्रदेश बनू लागलेला आहे. या भूभागावरील पाण्याअभावी हिरवळ नष्ट झाल्याने ही स्थिती ओढवली आहे. हवेतील गारवा नष्ट झाल्याने या परिसरातील जमिनीतील पाणी आटले गेले. परिसर कोरडाठाक झाला आहे. परिणामी या संपूर्ण भागातील जैवविविधता नष्ट झाल्याचेही पाहायला मिळते आहे. जागतिक वातावरणात होणारे बदल, तापमान वाढ आणि या नैसर्गिक प्रक्रियेकडे होणारे दुर्लक्ष या सर्वांचा परिणाम म्हणून आज युरोपात वाळवंटे आणि उष्ण हवेच्या ठिकाणांत वाढ होऊ लागली आहे. हे सारे वातावरण बदलाचे प्रमाण निसर्गाचे संतुलनच बिघडवत आहेत.
जागतिक पर्यटकांचे आकर्षण बनलेल्या युरोपात आता उष्माघाताचा अनुभव येऊ लागल्याने तेथील पर्यटन व्यवसायावर साहजिकच परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. यात स्पेन आणि पोर्तुगालला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता यासंबंधीच्या विविध अहवालातून दिसून आलेली आहे. स्पेनला यावर्षी मोठ्या प्रमाणात भयंकर अशा दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यंदाच्या मार्च आणि एप्रिल महिन्यात गरमीचा प्रकोप वाढला असल्याचे निदर्शनास आले आहे. 1993 नंतरचा यंदाचा दुष्काळ भयानक असा असून देशातील पाण्याचे साठे लुप्त होत आहेत. एकेकाळी पुलाच्या खालून वाहणारी नदीच गायब झाल्याचे देशातील अनेक भागात दिसत आहे. बारामाही वाहणाऱ्या नद्यांची पातळी खालावलेली आहे. यामुळे नदीतून होणारी मालवाहतूक क्षमतेपेक्षा अत्यंत कमी प्रमाणात करावी लागत असल्याने उत्पादन खर्चात वाढ होत असल्याने त्याचा थेट परिणाम महागाईत होताना दिसतो आहे. यासाऱ्याचा सामना सामान्यांना करावा लागतो आहे.
नद्यांची पातळी दिवसेंदिवस खालावत असून त्याचा परिणाम शेती, बागायती, जलवाहतुकीवर होत आहे. नदीची पातळी घसरल्याने त्याचा मोठा परिणाम नदीकाठी असलेल्या जैव संपदेवर होत असतो. परिसरातील जैव संपदेचा ऱ्हास झाल्याने जमिनीची धूप सुरु होते. जमिनीचा ओलसरपणा नष्ट झाल्याने पुढे भेगा पडू लागतात. पुढे या भूभागाची धूप झाल्याने अखेर वाळवंटी प्रदेशाची निर्मिती सुरु होते. इटलीमधील नद्यांतील उंचवटे पाण्याच्या पातळीवर आलेले असून त्याचा मोठा अडथळा हा जलवाहतूक करणाऱ्या जहाजांवर होतो. सध्या इटलीतील नद्यांमधून वाहतूक करणारी मालवाहू जहाजे क्षमतेच्या केवळ एक चतुर्थांश वाहतूक करताना दिसत आहेत. गेल्या 500 वर्षांत अशाप्रकारच्या दुष्काळाचा सामना करावा लागला नाही. वारंवार दुष्काळामुळे हवेतील गारवा नष्ट झाल्याने कोरडी हवा यामुळे वातावरण, जमीन आणि नदीतील पाणी आटू लागले. जगातील आबादी आबाद असलेल्या युरोपवर वाळवंट निर्मितीची नैसर्गिक आपत्ती ओढवलेली आहे.
नैसर्गिक साधनांचा बेसुमार वापर करणाऱ्या युरोपियन देशांना आता निसर्गाची महती कळून चुकलेली आहे. विज्ञानाने भरपूर प्रगती केलेली आहे, मात्र पावसाचे वेळापत्रक बनवणे अजून तरी कोणा शास्त्रज्ञाला शक्य झालेले नाही. युरोपात आजही शेकडोंच्या संख्येने पोलाद निर्मिती प्रकल्प आहेत. कोळशावर चालणारे औष्णिक वीज प्रकल्प कार्यरत आहे. जागतिक तापमान वाढीचे कारण देत दक्षिण आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका खंडावरील देशांना विकासापासून रोखण्याचे प्रयत्न करणाऱ्या दुतोंडी युरोपला मात्र आगामी काळात आपल्या कर्माची फळे भोगावी लागणार आहेत.
प्रशांत कामत








