पुणे / वार्ताहर :
भारतीय लष्करात नोकरी लावतो असे सांगून एका तोतया लष्करी अधिकाऱ्याने आठ पेक्षा अधिक तरुणांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी प्रमोद यादव (मूळ रा. नाशिक) या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात राहुल बच्छाव यांनी तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार 2022 पासून आत्तापर्यंत घडला आहे. आरोपीने आत्तापर्यंत एकूण 28 लाख रुपयांची नोकरी लावण्याचा आमिषाने फसवणूक केल्याचे उघडकीस आलेले आहे.
तक्रारदार राहुल बच्छाव हे लष्करात भरतीसाठी प्रयत्न करत होते. त्यावेळी त्यांची ओळख आरोपी प्रमोद यांच्यासोबत झाली. यादव यांनी राहुल यांना भरतीबाबत मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. राहुलचा विश्वास संपादन करण्यासाठी लष्कराचा युनिफॉर्म घालून सात ते आठ डमी अधिकारी उभे केले. तसेच त्याला लष्करात भरती करण्याचे आमिष दाखवले. त्याच्यासह अन्य काही तरुणांनाही आरोपींनी आमिष दाखवले. आठ पेक्षा अधिक तरुणांकडून आरोपींनी भरतीसाठी एकूण 28 लाख रुपये घेतले. त्यानंतर आरोपींनी भरतीसाठी वेगवेगळी कारणे देत वेळ मारुन नेली. आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर राहुल बच्छाव याने याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याबाबत कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत.