जीआयडीसीचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड यांची माहिती यापुढे नवीन उद्योगांसाठी अर्ज ऑफलाईन स्वीकारणार
प्रतिनिधी / पणजी
गोव्यातील विविध औद्योगिक वसाहतींमधील एकूण 600 उद्योग बंद पडल्याची माहिती गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे (जीआयडीसी) अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड यांनी दिली आहे. त्यामुळे गोव्यातील उद्योग क्षेत्रात प्रगती चालू आहे की अधोगती? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गोवा इलेक्टॉनिक्स लिमिटेडकडे (जीईएल) उद्योग क्षेत्राची काही कामे महामंडळाने दिली होती, त्याबाबत महामंडळाला वाईट अनुभव आल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे यापुढे उद्योगांसाठी ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन पद्धतच अंमलात आणण्याचे संचालक मंडळाने ठरवले आहे, असेही ते म्हणाले.
जीईएलकडून वाईट अनुभव
नवीन उद्योगांसाठी महामंडळाने अर्ज स्वीकारण्याचे काम ऑनलाईन पद्धतीने सुऊ केले होते. हे काम जीईएलकडे सोपविण्यात आले होते, परंतु त्या व इतर कामात समाधानकारक प्रगती नसल्याने ती कामे आता महामंडळातर्फे ऑफलाईन म्हणजे पूर्वीप्रमाणेच करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला, असे रेजिनाल्ड यांनी सांगितले.
परवाना प्रक्रिया सुटसुटीत करणार
महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रविमल अभिषेक म्हणाले की, औद्योगिक वसाहतीमध्ये बांधकाम परवाना प्रक्रिया सुटसुटीत केल्यामुळे गेल्या सहा महिन्यांत परवाना पद्धतीत सुधारणा झाली आहे. महामंडळाचे संचालक श्वेतीका सचिन यांनी सांगितले की, येत्या 6 महिन्यात विविध परवाने देण्याची प्रक्रिया सोपी, सुटसुटीत करण्यात येणार आहे. उद्योगांसाठी बांधकाम परवान्यात वाढ झाल्याचा दावा महामंडळातर्फे करण्यात आला आहे.
जीईएलबाबत महामंडळाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यांची सेवा चांगली नाही असाच त्या तक्रारींचा एकंदरित सूर होता म्हणून त्यांच्या सर्व सेवा बंद करण्याचे महामंडळाने निश्चित केले आहे. विविध सेवांसाठी आता सल्लागार कंपनी नेमण्याचे ठरवले आहे. जे उद्योग बंद पडले त्यांची कारणे शोधण्यासाठी त्यांना नोटिस पाठवणार असल्याची माहिती आलेक्स रेजिनाल्ड यांनी दिली.









