धोकादायक वळणाच्या बाबतीत ‘साबांखा’ साहाय्यक अभियंत्यांचे आश्वासन, जागरुक नागरिकांनी उठविलेल्या आवाजाचा लगेच परिणाम
प्रतिनिधी / काणकोण
करमल घाटातील धोकादायक वळणाचा प्रश्न काणकोणच्या जागरुक नागरिकांनी आता लावून धरला आहे. या वळणावर तात्पुरता लाकडाचा कठडा बांधण्याच्या तयारीत असलेल्या बांधकाम ठेकेदाराच्या कामाला आक्षेप घेतानाच जर सरकार या वळणावर संरक्षक कठडा बांधायला असमर्थ असेल, तर काणकोणची जनता स्वखर्चाने तो कठडा बांधून द्यायला तयार आहे, असेही जाहीर करण्यात आलेले आहे. या घडामोडीनंतर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या महामार्ग विभागाचे साहाय्यक अभियंता सागर शेट्यो यांनी त्वरित करमल घाटातील सदर वळणाच्या स्थळी येऊन नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या. एवढेच नव्हे, तर 15 दिवसांत या ठिकाणी दगडी संरक्षक कठडा बांधून दिला जाईल आणि या कामाला लगेच सुरुवात करण्यात आलेली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी काणकोणचे माजी आमदार विजय पै खोत, ‘गोंयकार’ या बिगरसरकारी संघटनेचे अध्यक्ष जॅक फर्नांडिस, माजी उपनगराध्यक्ष दिलीप केंकरे, आगोंदचे माजी सरपंच शाबा गावकर, काणकोण पत्रकार संघाचे अध्यक्ष बबेश बोरकर आणि अन्य सदस्य उपस्थित होते. हा प्रश्न काणकोणच्या पत्रकारांनी उचलून धरल्याबद्दल पै खोत यांनी त्यांचे यावेळी अभिनंदन केले. त्याचबरोबर काणकोणची जनता फार संयमी आहे. या वळणाच्या ठिकाणी रूंदीकरण कधी होईल तेव्हा होईल, त्यापूर्वी तात्पुरती उपाययोजना करण्याची साधी मागणी काणकोणवासीय करत आहेत. मुंबई ते मेंगलोरपर्यंतच्या रस्त्याचे रूंदीकरण त्वरित होते. मग काणकोणचेच का होत नाही, असा सवाल त्यांनी केला. हे काम जर झाले नाही, तर काणकोणचे जागरुक नागरिक रस्त्यावर यायला मागेपुढे पाहणार नाहीत, असा इशारा पै खोत यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
परवानगी नसताना निविदा कशी निघाली ?
26 जानेवारी रोजी या ठिकाणची 26 झाडे मारण्यात आली. ती झाडे जर असती, तर मुंबईच्या युवकाचा बळी गेला नसता. अपघातात सापडलेले वाहन झाडांच्या आधाराने खाली पडण्यावाचून वाचले असते, याकडे फर्नांडिस यांनी लक्ष वेधले. त्याचबरोबर वन खात्याने जर रस्ता रुंदीकरणाला परवानगी दिलेली नाही, तर या रस्त्याच्या रूंदीकरणाच्या कामाची निविदा कशी जाहीर झाली, असा सवाल त्यांनी केला. यामागे काही राजकीय उच्चपदस्थांचा हात असून काणकोणच्या जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचाच हा प्रकार असावा, असे ते म्हणाले. तर दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या युवकाला या ठिकाणी जो अपघाती मृत्यू आला त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असल्याचा आरोप केंकरे यांनी केला.
गुळे ते करमल घाटपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचे काम दिलेल्या ठेकेदाराला प्रथम करमल घाटातील धोकादायक वळणाच्या ठिकाणी काम सुरू करण्यीचा आदेश दिलेला असून हे काम पंधरा दिवसांत पूर्ण होईल. साधारणपणे 70 ते 75 मीटर लांबीचा आणि 2 फूट उंचीचा दगडी कठडा या ठिकाणी उभारला जाईल. पक्के बांधकाम करण्यासाठी हा भाग सोयीस्कर नाही. त्यामुळे तात्पुरती व्यवस्था केली जाईल, अशी माहिती महामार्ग विभागाच्या अभियंत्याने दिली. या कामावर काणकोणची जनता लक्ष ठेवून राहणार असल्याची ताकीद यावेळी पै खोत यांनी दिली.









