रायबागमध्ये नैसर्गिक मृत्यूचा तपास खुनापर्यंत
वार्ताहर / कुडची
आईने आपल्या मुलाचा खून करून नैसर्गिक मृत्यू भासवलेले प्रकरण पोलिसांनी उघडकीस आणले. रायबाग पोलिसांनी ही कारवाई केली. अनैतिक संबंधाची माहिती मुलाला कळल्याने आईने आपल्या नातेवाईकांच्या मदतीने मुलाचा खून केला होता. महिन्याभरानंतर हे प्रकरण उघडकीस आले. हरीप्रसाद संतोष भोसले रा. रायबाग असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. सुधा उर्फ माधवी संतोष भोसले रा. रायबाग, वैशाली सुनील माने रा. शिंगणापूर ता. करवीर, जिल्हा कोल्हापूर, गौतम सुनील माने अशी संशयित मारेकऱ्यांची नावे आहेत. यामध्ये सुधा उर्फ माधवी ही मृत मुलाची आई तर वैशाली व गौतम हे जवळचे नातेवाईक आहेत.
याबाबत माहिती अशी, रायबाग येथे संतोष भोसले हे पत्नी व दोन मुलांसह राहतात. त्यांचे भांड्याचे दुकान आहे. या दुकानात बसताना संतोषची पत्नी चुडीदार ड्रेस घालून बसायची. त्यातून त्यांचे घरात भांडण व्हायचे. सुधा व उर्फ माधवी हिचे अनैतिक संबंध असल्याची माहिती मुलगा हरिप्रसाद याला समजली होती. त्यामुळे सुधा हिने आपल्या मुलाला मारण्याचा कट रचला. त्यासाठी आपल्या नातेवाईकांची मदत घेऊन हरिप्रसाद याचा 28 मे रोजी खून केला. त्यानंतर झोपलेल्या जागेवरून मुलगा उठत नसल्याचे सांगत लोकांना गोळा केले. तो मृत झाल्याचे समजल्याने सर्वांना धक्का बसला.
हरिप्रसाद याचे वडिल संतोष बाहेरगावी गेले होते. ते आल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाचा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगून पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करून महिन्यामध्येच याचा छडा लावला.
मुलाच्या खूनप्रकरणात आईने आपल्या नात्यातील सात जणांची मदत घेतल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यातील तिघांना अटक करण्यात आली असून इतर फरारी आहेत. घटनास्थळी गुरूवारी पोलिस अधीक्षस संजीव पाटील यांनी भेट देऊन रायबाग पोलिस पथकाचे अभिनंदन केले. पोलिस उपअधीक्षक श्रीपाद जल्दे यांच्या मार्गदर्शनाखाली रायबागचे सीपीआय एच. डी. मुल्ला यांनी सहकाऱ्यांसह तपास करून याचा छडा लावला.









