हंगाम वाया जाण्याची शेतकऱ्यांना चिंता
वार्ताहर / मंगसुळी
पारंपरिक शेती व्यवसायातून अनेक पिके घेतली जातात. अनुकूल हवामान व पावसाची साथ लाभल्यास भरघोस उत्पादन हाती लागून शेतकऱ्याची आर्थिक उन्नती होते. मात्र निसर्गाने अवकृपा दाखविल्यास बळीराजा अडचणीत सापडतो. असे चित्र यंदा वळिवाने दिलेली हुलकावणी व लांबलेल्या मान्सूनमुळे मंगसुळी परिसरातील हळद व सोयाबीन उत्पादक अडचणीत सापडला आहे. पावसाअभावी यंदाचा हंगामच वाया जाण्याच्या चिंतेत बळीराजा आहे.
उन्हाळी हंगामात मंगसुळी परिसरात एकही वळीव झाला नाही. त्यातच जून महिना संपत आला तरी मान्सूनचे आगमनच झालेले नाही. मे महिन्याच्या मध्यावर अनेकांनी हळद व सोयाबीन लागवडीसाठी मशागत करून शेती सज्ज ठेवली होती. तसेच अनेक शेतकऱ्यांनी हळद बियाणे खरेदी केली. मे अखेर लागवडीसाठी सज्ज असतानाही पावसाने प्रारंभच न केल्याने लागवडीसाठी आणलेली हळद बियाणे तशीच पडून आहेत.
येथील प्रगतशिल शेतकरी शरद पाटील यांनी हळद बियाणे खरेदी केले होते. पावसाअभावी लागवड न केल्याने शेतातील झाडाखाली सावलीत ठेवलेल्या बियाणांना कोंब फुटले आहे. यामुळे सदर बियाणे लागवडीसाठी मारक ठरणार आहेत. यामुळे पाटील हे मजुरांकरवी बियाणांना फुटलेले कोंब काढून लागवडीस योग्य अशी बियाणे तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातून त्यांच्या खर्चात वाढ झाली आहे.
लागवडीनंतर साधारणता पाच महिन्यात हळद काढणीस येते. योग्य हंगामात आणि हवामानाची साथ लाभल्यास हळद उताऱ्यात चांगली वाढ होते. तसेच दर्जेदार उत्पादन हाती लागते. या पाच महिन्यांच्या कालावधीत जमीन नांगरट, रोटर मारणे, सरी सोडणे, ठिबकचा वापर करणे. यानंतर हळदीची लागवड करण्यात येते. परिसरात सेलम जातीच्या बियाणांना अधिक मागणी आहे. यानंतर पिकाची योग्य ती निगा राखताना रासायनिक व सेंद्रिय खताची मात्रा दिल्यास चांगले उत्पादन मिळते. मात्र अद्याप पावसाला प्रारंभ न झाल्याने यंदाचा हंगाम वाया जाण्याची शक्यता पाटील यांनी व्यक्त केली. दरम्यान अद्याप पावसाने हजेरीच न लावल्याने मशागत आणि बियाणे खरेदी करुन ठेवली आहेत. पावसाने अशीच दडी दिल्यास या खर्चाचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसणार असल्याने चिंता व्यक्त होत आहे.









