प्रतिनिधी / पणजी
गोव्याची ओळख केवळ समुद्र आणि स्वस्त मिळणारी दारू अशी पसरवली जात आहे. त्यामुळे गोवेकरांची संस्कृती, सण हे कधीच समजले नाही. परंतु गोव्यात असे काही सण आहेत जे गोमंतकीय संस्कृतीशी जोडले गेले आहेत किंवा पोर्तुगीजकालीन जी परंपरा गोव्यात रूजविण्यात आली त्याच्याशी जोडले गेले आहेत. अशाप्रकारातील एक सण म्हणजे विवा सांजाव. इतर सणांप्रमाणेच सांजाव हा वैशिष्ट्यापूर्णरित्या साजरा केला जातो. विशेषत: मान्सूनचे आगमन किंवा पावसाळ्यात साजरा केल्या जाणाऱ्या इतर सणांचे आगमन म्हणून हा सण साजरा केला जातो.
पावसाळा सुरू होताच ‘व्हिवा सांजाव’ किंवा ‘सांजाव आयलो रे’ अशा उत्साहपूर्ण आरोळ्या 24 जूनला गोव्याच्या कानाकोपऱ्यात घुमतात. या दिवशी ख्रिस्ती बांधव डोक्यावर फुलांचा मुकुट, वेलींचे वेटोळे व अंगावर रंगीबेरंगी कपडे असा पेहराव करून विहिरीत उड्या मारतात आणि याला सोबत मिळते ती हाता पायांना आपोआप थिरकायला लावणाऱ्या पारंपरिक घुमट वाद्याची अथवा ब्रास बँडच्या तालाची. पारंपारिक बँड, वाद्याने आणि त्यात जोरदार पावसाच्या हजेरीमुळे संपूर्ण वातावरण बदलते.
ख्रिश्चन धर्मशास्त्रानुसार संत जॉन बाप्तीस्त गर्भात असताना त्याची आई एलिझाबेथ मदर मेरीला भेटायला गेली होती. यावेळी मेरीने एलीझबेथला जीजसच्या जन्माची बातमी ऐकवली हे ऐकून आनंदीत झालेल्या जॉन बाप्तीस्त यांनी आईच्या पोटातच उडी मारली. या सणामध्ये विहिरीला एलिझाबेथच्या गर्भाशयाचे प्रतीक समजले जाते व त्यात उडी मारणे म्हणजे ख्रिस्तजन्माचा आनंद साजरा करण्यासारखे असल्याची भावना ख्रिस्ती बांधव बाळगतात. संत जॉन बाप्तीस्त यांचा जन्मदिवस म्हणूनही गोव्यात सांजावच्या रूपाने साजरा केला जातो.
सांजावच्या वेळी जर पाऊस नसेल तर हिरमोड होऊ नये म्हणून अलीकडे कृत्रिम पावसाचीही सोय केली जाते. ग्रामीण भागात विहिरींमध्ये तर शहरी भागात कृत्रिम तळे तयार करू न त्यात डुबकी मारून हा सण साजरा केला जातो. सांजावच्यादिवशी डोक्यावर काटेरी मुकुट, गळ्यात घुमट व फुलांच्या माळा, हातात माडाचे पिडे व अन्य वाद्ये वाजवत नाचत गात लोक गटागटाने फिरतात. विहिरी, तलावात उड्या मारून मौजमस्ती करतात. डोक्यावर गोलाकार आकाराची चक्रे सजवतात. त्यांना कॉपेल म्हटले जाते. नवविवाहित जोडप्यांना पानाफुलांचा मुकुट घालून वैवाहिक आयुष्याच्या शुभकामनेसाठी गावच्या विहिरीत डुबकी मारायला लावली जाते. सांजावच्या परंपरेत नव्या पिढीचा उत्साहही जोडला जातो.
गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या संकल्पनेतून प्रथमच सांजावला राज्य उत्सव म्हणून दर्जा प्राप्त झाला आहे. त्याच अनुषंगाने पारंपारिकरित्या साजरा केला जाणारा सांजाव यंदा प्रथमच सरकारी पातळीवर साजरा करण्यात येणार आहे. उद्या दि. 24 रोजी गोवा पर्यटन खाते आणि पर्यटन विकास महामंडळातर्फे हेलिपेड दौजा एला जुने गोवा येथे सकाळी 10 वा. ते रात्री 10 वाजेपर्यंत हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवातून कित्येक कलाकारांना कला सादर करण्याची संधी प्राप्त होणार आहे. हा उत्सव सरकारी पातळीवर साजरा करण्यात येत असल्याने सरकारचे स्तुत्य पाऊल समजले जाईल.