वाळवंटात देवतांच्या पाऊलखुणा
एकेठिकाणी देवतांच्या पाऊलखुणा दिसून येतात अन् रात्री तेथे पऱ्या उतरत असल्याचे सांगितल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. अशाच प्रकारच्या कथा सामावून असलेल्या एका वाळवंटाचे रहस्य अद्याप कायम आहे. जगातील सर्वात जुन्या नामीब वाळवंटाचे रहस्य वैज्ञानिकांना अद्याप उकलता आलेले नाही. दक्षिण पश्चिम आफ्रिकेच्या अटलांटिक किनाऱ्याला लागून असलेले नामीब वाळवंट पृथ्वीवरील सर्वात कोरड्या ठिकाणांपैकी एक आहे. येथे लाखोंच्या संख्येत गोलाकृती निशाण्या तयार झाल्या आहेत. स्थानिक हिम्बा समुदायानुसार या वर्तुळाकृती निशाण्या आत्म्यांकडून तयार करण्यात आल्या आहेत. तसेच हे मुकुरू देवतेच्या पाऊलखुणा असल्याचे त्यांचे मानणे आहे. रात्रीच्या वेळी येथे पऱ्या उतरत असल्याने अशा खुणा तयार झाल्याची समुदायात वदंता आहे. तर काही वैज्ञानिकांनुसार परग्रहवासीय येथे येत असतात. याचमुळे त्यांच्या युएफओच्या खुणा दिसून येतात. या ठिकाणाच्या रहस्याची उकल करण्याचा प्रयत्न वैज्ञानिकांनी अनेक वर्षांपासून चालविला आहे, परंतु त्यांना अद्याप यश मिळालेले नाही. तर काही संशोधनांनुसार या वर्तुळाकृती निशाण्या वाळवीमुळे तयार झाल्या आहेत, वाळवी जमिनीत पाणी अन् पोषक घटकांचा शोध घेत असतात. पाऊस पडून गेल्यावर अचानक पणे हे वर्तुळाकार निर्माण होतात असे सांगण्यात येते.
सर्वात दुर्गम ठिकाण
हे वाळवंट सुमारे 81 हजार चौरस किलोमीटरमध्ये फैलावलेले आहे. जगातील सर्वात मोठे वाळवंट सहारा हे 20-70 लाख वर्षांपूर्वी तयार झाले आहे, तर नामीब वाळवंट 5 कोटी 50 लाख वर्षांपूर्वी तयार झाले असावे असे सांगण्यात येते. उन्हाळ्यात येथील तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते, तर हिवाळ्यात येथे पाणी गोठून जाईल इतपर्यंत तापमान खालावत असते. वास्तव्याच्या दृष्टीकोनातून हे जगातील सर्वात दुर्गम ठिकाण असले तरीही लोक येथे राहत आहेत. नामीब वाळवंटात वर्षाकाठी सरासरी केवळ 2 मिलिमीटर पाऊस पडतो. अनेक वर्षे तर पाऊस पडत देखील नाही. तरीही येथे अनेक प्राणी आढळून येतात.









