जम्मू-काश्मीर प्रशासनाकडून दोघेही बडतर्फ : 14 वर्षे जुन्या प्रकरणी कारवाई
वृत्तसंस्था /श्रीनगर
पाकिस्तानचे हस्तक म्हणून काम करणाऱ्या दोन शासकीय डॉक्टरांना जम्मू-काश्मीर प्रशासनाने बडतर्फ केले आहे. दोन्ही डॉक्टरांवर उत्तरीय तपासणी अहवालात फेरफार करण्याचा आरोप आहे. दोन्ही डॉक्टरांच्या गुन्ह्यामुळे काश्मीरमध्ये हिंसा भडकली होती. 42 दिवसांपर्यंत काश्मीर खोऱ्यात तणाव राहिला होता. 2009 च्या ‘शोपियां बलात्कार’प्रकरणी खोटे पुरावे उभे केल्याप्रकरणी डॉ. बिलाल अहमद दलाल आणि डॉ. निघत शाहीन चिल्लू यांना त्यांच्या पदावरून हटविण्यात आले आहे. शोपियांमध्ये 30 मे 209 रोजी आसिया आणि निलोफर या दोन महिलांचे मृतदेह एका नदीत आढळून आले होते. जवानांनी या महिलांवर बलात्कार करत त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप झाला होता.
डॉक्टर बिलाल आणि डॉ. चिल्लू यांनी पाकिस्तानसोबत कट रचून आसिया आणि निलोफर यांच्या उत्तरीय तपासणी अहवालात खोटे निष्कर्ष नोंदविले होते. दोन्ही डॉक्टरांचा उद्देश सुरक्षा दलांवर बलात्कार अन् हत्यांचा खोटा आरोप करून लोकांमध्ये असंतोष निर्माण करण्याचा होता. प्रत्यक्षात दोन्ही महिलांचा 29 मे 2009 रोजी बुडून मृत्यू झाला होता. डॉ. बिलाल आणि डॉ. चिल्लो यांना सेवेतून हटविण्यात आले आहे. त्यांच्यावर पाकिस्तानशी संगनमत करत आसिया अन् निलोफरच्या उत्तरीय तपासणीचा खोटा अहवाल तयार करण्याचा आरोप आहे. तत्कालीन राज्य सरकारमधील काही जणांना महिलांचा बुडून मृत्यू झाल्याचे सत्य माहित होते, परंतु ते समोर येऊ दिले गेले नाही. तर महिलांच्या मृत्यूप्रकरणी 42 दिवसांपर्यंत काश्मीर बंद राहिले होते. सीबीआयने याप्रकरणी चौकशी सुरू केल्यावर स्थितीत सुधारणा झाली होती. तपासादरम्यान दोन्ही महिलांवर बलात्कार झाला नव्हता असे स्पष्ट झाले हेते.









