अमेरिकन रेटिंग एजन्सी फिच रेटिंग्स यांचा अंदाज
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
अमेरिकन क्रेडिट रेटिंग एजन्सी फिच यांनी या अगोदर वर्ष 2023-24 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 6.0 टक्के दराने वाढेल असा अंदाज व्यक्त केला होता. फिचने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील मजबूत निकाल आणि अल्पावधीत अर्थव्यवस्थेला गती मिळण्याच्या परिणामांवर आधारित आपल्या अंदाजांमध्ये सुधारणा केली आहे. एजन्सी म्हणाली, ‘भारताची अर्थव्यवस्था व्यापक आधारावर ताकद दाखवत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वार्षिक आधारावर 6.1 टक्क्यांनी वाढला आहे. दरम्यान, वाहन विक्री, पीएमआय सर्वेक्षण आणि क्रेडिट वाढ अलीकडच्या काही महिन्यांत मजबूत राहिली आहे. ही कारणे पाहता, मार्च 2024 ला संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी आम्ही आमचा अंदाज 0.3 टक्क्यांनी वाढवून 6.3 टक्क्यांवर नेला आहे, असे फिचने सांगितले. मागील आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारताचा विकास दर 7.2 टक्के होता. त्याच वेळी, 2021-22 मध्ये देशाची अर्थव्यवस्था 9.1 टक्के दराने वाढली. मार्चच्या सुरुवातीला, वाढीव चलनवाढ आणि वाढीव व्याजदर तसेच कमकुवत जागतिक मागणीच्या पार्श्वभूमीवर फिचने 2023-24 साठी भारताच्या वाढीचा अंदाज 6.2 वरून 6 टक्क्यांवर कमी केला. 2024-25 आणि 2025-26 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 6.5 टक्के दराने वाढेल. तसेच जानेवारी-मार्च तिमाहीत जीडीपी वाढीचा दर अपेक्षेपेक्षा जास्त असल्याचे रेटिंग एजन्सीने म्हटले आहे.









