शरद पवार बरोबर बोलत असून 2024 ची लोकसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाने जिंकली तर ते येणाऱ्या काळात भाजप देशातील लोकशाही संपवेल. निवडणूका होणे बंद होतील. त्यामुळे विरोधी पक्षांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे मत आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी म्हटले आहे. भाजप पुन्हा सत्तेत आल्यास २०२४ नंतर कोणतीही निवडणूक होणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर संजय सिंह यांनी प्रतिक्रिया दिली. दिल्ली आद्यादेशावर कॉंग्रेसला डावलण्याचा ‘आप’चा उद्देश नसल्याचेही त्यांनी सांगितले.
दिल्लीत बोलताना खासदार संजय सिंह म्हणाले की, “शरद पवार जे म्हणाले ते अगदी बरोबर आहेत. भारतीय जनता पक्ष वेगवेगळ्या समुदायांना एकमेकांच्या विरोधात लढवत आहेत. मुस्लिमांना हिंदूंच्या विरोधात, जाटांना इतरांच्या विरोधात आणि आदिवासींना आदिवासींच्या विरोधात उभे करत आहे. मणिपूर जळत असताना पंतप्रधान अमेरिकेला पळून गेले आहेत.” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “दिल्लीमध्ये आणल्या जाणाऱ्या अध्यादेशाच्या मुद्द्यावर सर्व विरोधी पक्षांनी ‘आप’ला पाठिंबा दिला आहे. उद्याच्या बैठकीत काँग्रेसची भूमिका स्पष्ट होईल. सध्या दिल्ली अध्यादेशापेक्षा कोणताही मुद्दा मोठा नाही. दिल्ली मधील अध्यादेशावर काँग्रेसला डावलण्याचा आमचा हेतू नाही. भारताची संघसंरचना वाचवण्याचा हा उद्देश आहे.”