नदी-नाले कोरडे : चाराटंचाईचे दुर्भिक्ष : जांबोटी भागातील शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट
वार्ताहर /जांबोटी
बेळगाव जिल्ह्यातील अती पावसाचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे जांबोटी, कणकुंबी भागात पावसाने सपशेल पाठ फिरवल्यामुळे पावसाअभावी या भागात शेतकरीवर्गासमोर दुबार पेरणीचे सावट उद्भवले आहे. या भागात पाणीटंचाईबरोबरच जनावरांच्या चाऱ्याची गंभीर समस्या उद्भवल्यामुळे शेतकरीवर्ग पावसाअभावी हतबल बनला आहे. दरवषी या भागात जून महिन्याच्या प्रारंभापासून मान्सूनला सुऊवात होते. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीची कामे करण्यासाठी शेतकरीवर्गाला अनुकूल वातावरण होते. मात्र यावषी या भागात वळिवाने देखील जेमतेमच हजेरी लावल्यामुळे तसेच मृग नक्षत्राने सपशेल पाठ फिरवल्यामुळे शेतकरी वर्गासमोर गंभीर समस्या निर्माण झाली आहे. खानापूर तालुक्मयाच्या पश्चिम भागातील बहुतेक शेतकरीवर्ग शेतवडीमध्ये भात पेरणीऐवजी भात रोपलागवड अधिक प्रमाणात करतात. भातरोप लागवडीसाठी आवश्यक असलेल्या तऊची पेरणी जून महिन्याच्या प्रारंभी करण्यात येते. चालूवषी देखील पंधरा दिवसांपूर्वी या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्यामुळे शेतकरीवर्गाने घाईगडबडीत भात रोपांच्या तऊची पेरणी केली होती. मात्र भात रोपांच्या उगवणीसाठी जमिनीमध्ये आवश्यक ओलावा नसल्यामुळे भातरोपांची अर्धवट उगवण झाली आहे. तसेच ऐन हंगामातच मान्सूनने पाठ फिरवल्यामुळे तीव्र उन्हामुळे उगवण झालेल्या कोवळ्या भात रोपांचे तऊ वाळून जात आहेत. त्याचबरोबर त्यांची वाढदेखील खुंटली असल्यामुळे या भागात शेतकरी वर्गासमोर दुबार पेरणीचे सावट उद्भवले असून भातरोप लागवडीची कामे लांबणीवर पडणार आहेत.
रताळी लागवडही खोळंबली
जांबोटी-बैलूर भागात शेतीसाठी पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे या भागात केवळ खरीप हंगामात शेतवडीमध्ये पिकांची लागवड करण्यात येते. या भागातील शेतकरीवर्ग पावसाळ्यात आपल्या माळरानावरील जमिनीत मोठ्या प्रमाणात रताळी लागवड करतात. रताळी हे नगदी पीक असल्यामुळे त्यापासून शेतकरी वर्गाना आर्थिक लाभ मिळतो. या भागातील शेतकरी जून महिन्याच्या प्रारंभीच रताळी लागवडीसाठी आवश्यक मेरा ओढून दमदार पावसाला सुऊवात झाल्यानंतर रताळी लागवडीला प्रारंभ करतात. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंतही कामे पूर्ण करून शेतकरीवर्ग भातरोप लागवडीच्या कामाकडे वळतो. मात्र चालूवषी जून महिना संपायला आला तरी मान्सूनने पाठ फिरवल्यामुळे रताळी लागवड खोळंबली आहे. पावसाअभावी या भागातील मलप्रभा नदी तसेच नाले कोरडे पडले आहेत. विहिरी व कूपनलिका पाण्याअभावी ओस पडल्यामुळे या भागातील अनेक गावातील नागरिकांना जून महिन्यात पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे.









