हातनूर,वार्ताहर
Sangli News : हातनुर तासगाव रोडवर हातनूर पासून दोन किलोमीटरवर बेंदच्या वड्याजवळ मंगळवारी रात्री (१० वाजता) दुचाकीने दोन वाटसरूंना धडक दिल्याने दोघेही गंभीर जखमी झाले होते.त्यामधील एकाचा मृत्यू झाला.तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.त्याच्यावर तासगाव येथे खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी रात्री घडली असून या घटनेची नोंद तासगाव पोलिसात झाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, रात्री दहा वाजता राजेश गायकवाड व संगम पाटील हे दोन युवक जेवण झाल्यावर घराबाहेर रस्त्यावर फेरफटका मारत होते. त्याच वेळी तासगावहुन येणारी मोटारसायकल ते उभे असलेल्या विरुद्ध बाजूस येऊन जोरात धडक दिली.धडक येवडी जोरात होती की गाडी गटारीतून लांब जाऊन पडली. गाडीवरील दोघे शेतात पडले व रस्त्याकडेला उभे राहिलेले त्यातील राजेश गायकवाड (वय -२२)वर्षे याला डोक्याला गंभीर इजा झाली व दुसरा संगम पाटील (वय -२६ )वर्षे हा गाडीबरोबर ओढत गेला त्याच्या तोंडावर व डोक्याला गंभीर इजा झाली आहे.
घटना घडल्यानंतर मोटारसायस्वार पळून गेले. रस्त्यावरील अपघाताची बातमी हातनूर येथे समजताच दोघा जखमींना तात्काळ तासगवला रुग्णालयात दाखल केले. मात्र राजेश गायकवाडचा रस्त्यातच मृत्यू झाला. राजेश त्याच्या आईसोबत आजोळी राहत होता.सदर घटनेची नोंद पोलीस पाटील सचिन भोसले यांनी दिली. या अपघाताचा पंचनामा तासगाव पोलिस ठाण्याचे पोलीस थोरात यांनी केला असून, ते अधिकचा तपास करीत आहेत.









