प्रद्युम बोकडे उत्कृष्ट खेळाडू, अजिज राऊत उत्कृष्ट गोलरक्षक : उगवता खेळाडू किजर डोनी
बेळगाव : रोट्रक्ट क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव आयोजित पाचव्या स्पाडा चषक सिक्स साईड फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मजहर युनायटेड संघाने गजानन एफसी कोल्हापूर संघाचा 1-0 असा पराभव करून स्पाडा चषक पटकाविला. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू प्रद्युम बोकडे तर अजिज राऊत उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
जक्किनहोंडा येथील किक फ्लॅक्स टर्फ फुटबॉल मैदानावरती आयोजित करण्यात आलेल्या स्पाडा चषक स्पर्धेत एकूण 32 संघांनी भाग घेतला होता. गोवा, कोल्हापूर, हुबळी व बेळगाव येथून संघांना निमंत्रित करण्यात आले होते. अंतिम सामना मजहर युनायटेड बेळगाव व गजानन एफसी कोल्हापूर यांच्यात झाला. या सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे गोलफलक कोराच राहिला. दुसऱ्या सत्रात खेळ संपण्यास काही मिनिटे बाकी असताना प्रद्युम बोकडेने मारलेला वेगवान फटका गोल मुखात शिरून मजहर युनायटेडने 1-0 ची आघाडी मिळवली. त्यानंतर गजानन एफसी संघाने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही. शेवटी हा सामना मजहर युनायटेड 1-0 असा निसटता पराभव करून विजेतेपद पटकाविले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे टीएफसीचे बॉक्सींग कोच सत्येद्र त्रिपाटी, जिल्हा रोट्रक्ट क्लबचे 3170 चे प्रतिनिधी अनिकेत जाधव, रोट्रक्ट क्लबचे अध्यक्ष मनोज त्रिपाटी, सचिव तनिष्का कामत, इव्हेन्ट मेंटर योगेश पाटील, इव्हेन्ट चेअरमन अनिकेत नाईक, अमय पाटील आदी मान्यवरांच्याहस्ते विजेत्या मजहर युनायटेड संघाला आकर्षक चषक तर उपविजेत्या गजानन एफसीला चषक व 8 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र देऊन गौरविले. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू प्रद्युम बोकडे, उत्कृष्ट गोलरक्षक अजिज राऊत, उगवता खेळाडू किजर डोनी यांना चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रोट्रक्ट क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.









