बैठकीकडे देशवासियांचे लक्ष : 15 पक्षांचे नेते सहभागी होण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ पाटणा
भाजपेतर विरोधी पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवार, 23 रोजी पाटणा येथे होणार असून या बैठकीकडे देशवासियांचे लक्ष लागलेले आहे. 2024 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी भाजपेतर पक्षांना एकत्र करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पुढाकार घेत या बैठकीचे आयोजन केले आहे. विरोधी पक्षांच्या या पहिल्याच बैठकीमध्ये किती पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहतात याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.
बिहारच्या महाआघाडी सरकारने 23 जून रोजी पाटणा येथे होणाऱ्या विरोधकांच्या सर्वात महत्त्वाच्या बैठकीचा कार्यक्रम निश्चित केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक सुमारे पाच तास चालणार आहे. या कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भूमिकेकडे विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पुढील वषी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा पराभव कसा करायचा याच्या रणनीतीवर चर्चा अपेक्षित आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीला देशभरातील सुमारे 15 राजकीय पक्ष सहभागी होणार असल्याचे आतापर्यंतच्या राजकीय हालचालींवरून दिसून येत आहे. ममता बॅनर्जींसह काही विरोधी नेते 22 जूनच्या संध्याकाळी पाटण्याला पोहोचतील. बिहार सरकारने सरकारी विश्रामगृह आणि पाटणा सर्किट हाऊसमध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे.
बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत होणाऱ्या बैठकीला नितीशकुमार, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. तसेच उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, फारुख अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती आणि डाव्या पक्षांचे नेते उपस्थित राहण्याची शक्मयता आहे.
सर्व विरोधी नेत्यांना एका व्यासपीठावर आणण्यात मोलाचा वाटा उचलणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या भाषणाने बैठकीला सुरुवात होईल. विरोधी एकजुटीची गरज का आहे यावर ते बोलतील. तसेच नरेंद्र मोदी यांच्या सध्याच्या सरकारमुळे देशासमोर असलेल्या समस्यावरही ते भाष्य करतील. नितीशकुमार यांच्या उद्घाटनपर भाषणानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे भाषण होईल. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्ली आणि पंजाबच्या समस्यांवर भाष्य करणार आहेत. तसेच केंद्र सरकारच्या अध्यादेशाबाबतही ते इतर पक्षांना पाठिंबा मिळविण्यासाठी आग्रही भूमिका मांडण्याची शक्यता आहे.
शरद पवार यांच्या सूचना महत्त्वाच्या
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचना विरोधी पक्षनेत्यांसाठी खूप महत्त्वाच्या असल्याचीही चर्चा आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सपा प्रमुख अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फाऊख अब्दुल्ला आणि पीडीपी अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांच्यासह डावे नेतेही आपापली मते मांडणार आहेत. अधिवेशनाच्या शेवटी राहुल गांधी संबोधित करतील.









