केएमएफच्या नव्या अध्यक्षांचे स्पष्ट संकेत : प्रतिलिटर 5 रु. वाढ शक्य
प्रतिनिधी/ बेंगळूर
वीज दरवाढीनंतर राज्यातील जनतेला आता दूध दरवाढीचा शॉक बसणार आहे. राज्य दूध महामंडळाचे नवे अध्यक्ष भीमा नायक यांनी यासंबंधीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. नंदिनी दूध आणि दह्याच्या किमती केव्हापासून वाढतील, याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर असून ते राज्यात परतल्यानंतर यावर निर्णय होऊ शकतो.
नंदिनी उत्पादनांचे दर वाढविण्याची विनंती विविध दूध संघटनांनी केली आहे. दिवसेंदिवस आवश्यक वस्तुंचे दर वाढत असताना दुधाचे दर स्थिर आहेत. शेतकऱ्यांना अधिक प्रोत्साहनधन द्यावे लागत असल्याने केएमएफला जादा पैसे मोजावे लागत आहेत. दूध पुरवठा संघटनांनी दरवाढीची मागणी केल्याने नंदिनी दूध दरात प्रतिलिटर 5 रुपये वाढ करण्याचा विचार चालविला आहे. त्यामुळे दूध आणि दह्याचे दर वाढविण्यासंबंधी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे भीमा नायक यांनी सांगितले आहे.
राज्यात दुधाचे उत्पादन कमी झाले आहे. लम्पिस्किनमुळे अनेक दुभती जनावरे दगावली आहेत. त्यामुळे गायी पाळण्यास शेतकरी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. याचा परिणाम दूध उत्पादनावर झाला आहे. 5 रुपये प्रतिलिटर दूध दरवाढीची विनंती करण्यात आली आहे. जर दरवाढ झाली तर त्यातील 2 रुपये शेतकऱ्यांना प्रोत्साहनधन स्वरुपात दिले जाईल. सध्या शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर 5 रुपये प्रोत्साहनधन दिले जात आहे. दूर दरवाढीनंतर आणखी 2 रुपये वाढवून दिले जाईल, असे भीमा नायक म्हणाले.
शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा निर्णय घेणार : राजण्णा
सहकारमंत्री के. एन. राजण्णा म्हणाले, नंदिनी दूध संस्था ‘अमुल’मध्ये विलिन करण्याचा प्रश्नच नाही. केएमएफ ही संस्था राज्यातील ज्येष्ठ राजकारण्यांनी विस्तारलेली संस्था आहे. आपणही याच पावलावर पाऊल ठेवणार आहे. लोकांना जो ब्रॅन्ड आवडतो, तोच ते खरेदी करतात. त्यामुळे इतर ब्रॅन्डचे दूध विक्री करू नका नसे सांगता येणार नाही. आम्ही इतर ब्रॅन्डशी स्पर्धा करण्यास तयार आहे. नंदिनी दुधाला केरळ, मुंबईसह विविध ठिकाणी मोठी बाजारपेठ आहे. खासगी दूध संस्था शेतकऱ्यांना जादा दर देऊन दूध खरेदी करत आहेत. शिवाय दूध उत्पादन आणि त्यासाठी येणाऱ्या खर्चावर सरकार लक्ष ठेवून आहे. शेतकऱ्यांना दूध उत्पादनातून मिळणारा लाभांश कमी झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित जोपासण्याच्या निर्णय घेतला जाईल, असे सांगून त्यांनी दूध दरवाढीचे संकेत दिले.
केएमएफच्या अध्यक्षपदी भीमा नायक
काँग्रेस पक्ष सत्तेवर येताच मागील भाजप सरकारच्या कालावधीत निगम-महामंडळे, प्राधिकरणांवर केलेले सर्व सदस्यांचे नामनिर्देशन रद्द करण्यात आले होते. आता कर्नाटक दूध महामंडळाच्या (केएमएफ-कर्नाटक मिल्क फेडरेशन) अध्यक्षपदी आमदार भीमा नायक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. भीमा नायक हे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे निकटवर्तीय आहेत. ते विजयनगर जिल्ह्यातील हगरीबोम्मनहळ्ळी मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेवर निवडून आले होते.









