वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
चीनचे नेतृत्व हुकुमशाही प्रवृत्तीचे आहे, अशी स्पष्ट टीका अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी केली आहे. चीननेही यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. नुकताच अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी चीनचा दौरा केला होता. त्यांनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याशी थेट चर्चाही केली होती. त्यानंतर या दोन्ही देशांमध्ये उडालेल्या या शाब्दिक चकमकीमुळे अनेक तज्ञांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ब्लिंकन यांनी चीनशी तणाव कमी करण्याच्या हेतूने त्या देशाला भेट दिली होती. दोन्ही देशांमध्ये नेमकी चर्चा काय झाली हे समजले नसले तरी नंतर करण्यात आलेली व्यक्तव्ये आणि त्यांच्यावरच्या प्रतिक्रिया यामुळे या भेटीचा हेतू साध्य झाला की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
चीनच्या नेतृत्वाला हुकुमशहा म्हणणे ही विसंवादी आणि बेजबाबदार उक्ती आहे, अशी प्रतिक्रिया चीनने व्यक्त केली आहे. तसेच चीनला भडकविण्याचा हा प्रयत्न असल्याचेही चीनचे म्हणणे आहे. हा नवा वाद चीनने अमेरिकेवर सोडलेल्या बलूनमुळे निर्माण झाला आहे. काही महिन्यांपूर्वी हा बलून सोडण्यात आला होता. तो चुकून अमेरिकेच्या वायुक्षेत्रात पोहचला अशी सारवासारवी चीनने केली होती. तथापि, अमेरिकेने हा बलून हेरगिरी करण्यासाठी सोडला असल्याचा आरोप केला होता. नंतर तो अमेरिकेच्या विमानांनी पाडला होता. याच घटनेचा उल्लेख बायडेन यांनी एका निधीसंकलन प्रचारसभेत मंगळवारी केला होता. बलून पाडल्याने चीनचा अपेक्षाभंग झाला. त्यामुळे तेथील हुकुमशाही नेतृत्व सैरभैर झाले होते, असा टोमणा बायडेन यांनी लगावला होता. चीनने त्यावर आता प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.









