मायावतींचे प्रतिनिधी चर्चेसाठी दिल्लीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भाजपविरोधात विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी बिहारची राजधानी पाटणा येथे होणाऱ्या 23 जून रोजी होणाऱ्या बैठकीपूर्वी बहुजन समाज पक्षाने काँग्रेससोबत आघाडीसाठी प्रयत्न चालविले आहेत. बसपच्या प्रतिनिधीने काँग्रेस मुख्यालयात पोहोचून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याशी चर्चा केल्याचे समजते.
बसप किंवा काँग्रेसकडून याविषयी अधिकृत टिप्पणी करण्यात आलेली नाही, परंतु बसप सर्वेसर्वा मायावती यांच्याकडून मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्यासंबंधी काँग्रेसने विचार करावा असा संदेश देण्यात आला आहे. त्यानंतर 2024 मध्ये उत्तरप्रदेशात दोन्ही पक्षांनी प्रत्येकी 40 जागा लढवाव्यात असा फॉर्म्युला बसपकडून देण्यात आल्याची चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव एसए संपत कुमार आणि बसपचे तेलंगण प्रदेशाध्यक्ष आरएस प्रवीण कुमार यांची भेट झाली होती. यानंतर काँग्रेस अन् बसप यांच्यात आघाडी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली होती. अशा स्थितीत उत्तरप्रदेशातील बसपचा एक वरिष्ठ नेता दिल्लीत पोहोचून काँग्रेस मुख्यालयात जात काँग्रेसच्या वरिष्ठ पदधिकाऱ्याची भेट घेतली आहे.
दोन्ही पक्षांमध्ये आघाडी झाल्यास उत्तरप्रदेशात प्रत्येकी 40 लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे. तर काँग्रेसकडून अद्याप यावर विशेष स्वारस्य दाखविण्यात आलेले नाही. दोन्ही पक्षांची आघाडी झाल्यास मतांसाठीची जातीय समीकरणे जुळतील असा दावा केला जात आहे. उत्तरप्रदेशात समाजवादी पक्ष आणि बसप या दोन्ही पक्षांना मुस्लिमांची मते मिळत असल्याचे मानले जाते. तसेच काँग्रेसलाही मुस्लीम मतदारांचा काही प्रमाणात पाठिंबा मिळत राहिला आहे.
काँग्रेसकडून विचार शक्य
काँग्रेसच्या महासचिव प्रियांका वड्रा यांचे पक्षाला उत्तरप्रदेशात बळकटी मिळवून देणे गरजेचे असल्याचे म्हणणे आहे. अशा स्थितीत काँग्रेस या प्रस्तावावर विचार करू शकतो असे बसपच्या नेत्यांचे मानणे आहे. विरोधी पक्षांच्या ऐक्याच्याप्रयत्नांदरम्यान 2017 च्या आघाडीचा अयशस्वी प्रयोग पाहता समाजवादी पक्ष काँग्रेससोबत आघाडी करू इच्छित नाही. अशा स्थितीत बसपसोबत प्रत्येकी 40 जागा लढविणे काँग्रेससाठी राजकीयदृष्ट्या अधिक लाभदायक ठरू शकते.









