लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार प्रीमियर
सत्यजीत रे यांची लघुकथा ‘गोलपो बोलिए तारिणी खुरो’वर आधारित परेश रावल आणि आदिल हुसैन यांचा चित्रपट ‘द स्टोरीटेलर’ लंडनच्या बीएफआय साउथबँकमध्ये लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हमध्ये दाखविला जाणार आहे. यापूर्वी या चित्रपटाने अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
चित्रपट लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार असल्याने याचे दिग्दर्शक अनंत महादेवन अत्यंत अनांदी आहेत. बुसान, पाम स्प्रिंग्स, आयएफएफआय आणि आयएफएफकेमध्ये ‘द स्टोरीटेलर’ या चित्रपटाचे यापूर्वीच कौतुक करण्यात आले आहे. सत्यजीत रे यांच्या जन्मशताब्दीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट त्यांना मानवंदना देणारा असल्याचे महादेवन यांनी म्हटले आहे.
एक धनाढ्या उद्योजक स्वत:च्या अनिद्रेच्या समस्येला दूर करण्यासाठी कथाकाराची मदत घेतो आणि यानंतर त्याच्या जीवनात घडून येणारे बदल या चित्रपटात दाखविण्यात आले आहेत. मूळ बंगाली लघुकथा ‘गोलपो बोलिये तारिणी खुरो’ ही सत्यजीत रे यांच्याकडून लिहिण्यात आलेल्या कथांपैकी एक आहे. त्यांनीच निर्माण केलेल्या तारिणी खुरो या व्यक्तिरेखेवर ही आधारित आहे. चित्रपटात परेश रावल, आदिल हुसैन यांच्यासोबत तनिष्ठा चटर्जी, जयेश मोरे आणि रेवती यासारखे कलाकार दिसून येणार आहेत.









