पुणे / प्रतिनिधी :
कोरोना काळात भ्रष्टाचार झाला, ही वस्तुस्थितीच आहे. या काळात अनुभव नसलेल्या कंपन्यांना कोविड सेंटर उभारणीचे कंत्राट देण्यात आले. लोकांच्या जीवाशी खेळ करण्यात आला. ईडीने कुणावर नेमकी काय कारवाई केली, याबाबत आपल्याला माहिती नाही. मात्र, ज्यांचा संबंध असेल त्यांच्यावरच धाड टाकण्यात येत असेल. यासंदर्भात ईडीच अधिकृत माहिती देऊ शकेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले.
युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्या घरावर ईडीकडून धाड टाकण्यात आली. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, कोरोना काळात ज्या कंपन्यांना कोणताही अनुभव नव्हता, अशा कंपन्यांना कोविड सेंटर उभारण्याचे काम देण्यात आले. आधी कंत्राट दिले, त्यानंतर कंपन्या स्थापन करण्यात आल्या. असे गंभीर प्रकार समोर आले आहेत. यामुळे काही लोकांना जीवही गमवावा लागला आहे.
पुण्यात तर अशा गैर कारभारामुळे एका पत्रकाराचा मृत्यू झाला होता. कोविड घोटाळय़ाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसआयटीची स्थापना केली आहे. याप्रकरणी चौकशी चालली आहे. ही चौकशी कुठपर्यंत आली आहे, एसआयटीला काही मिळाले का, याबाबत मला काही माहिती नाही. तसेच ईडीने जी छापेमारी केली, त्याबाबतही मला काही माहीत नाही. ईडीकडूनच याची माहिती मिळेल.