ऑनलाईन टीम / तरुण भारत :
प्रभू श्रीरामांवर काँग्रेसची आस्था आहे. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी अयोध्येत राम मंदिर व्हावे यासाठी सर्वात आधी प्रयत्न केले होते. भाजपला आता फक्त मतांसाठी प्रभू श्रीराम हवे आहेत. त्यांनी कर्नाटकात बजरंगबलींचा प्रयोग करुन पाहिला, पण त्यांना बजरंगबलींनी साथ दिली नाही. प्रभू श्रीरामही या खोटारडय़ा भाजपला साथ देणार नाहीत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसुचित जाती विभागाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले, शाहू, फुले आंबेडकरांच्या विचाराच्या भूमीत समाजात धार्मिक वातावरण बिघडवण्याचे काम सुरु आहे. पण जनतेने भाजपाच्या या षडयंत्रला बळी पडू नये. भाजपाला फक्त मते मागण्यासाठी श्रीराम हवे आहेत. कर्नाटकात त्यांनी मतांसाठी बजरंगबलींच्या नावाचा वापर करून पाहिला पण बजरंगबलींनी साथ दिली नाही. आताही भाजपा श्रीरामाच्या नावाचा वापर करेल. पण तो प्रयत्नही निष्फळ ठरेल. कारण खोटी आश्वासने देऊन मोदी सत्तेत आले पण जनतेला आता ही चूक लक्षात आली असून 2024 च्या निवडणुकीत जनता पुन्हा चूक करणार नाही.