काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची मागणी : काँग्रेस कार्यकर्त्यांची पेडणे पोलीस स्थानकावर धडक, पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर
पेडणे : धारगळ सुकेकुळण येथे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीच्या लिंक रस्ताच्या कामावर असलेल्या ट्रकने दुचाकीला चिरडले. यात नामदेव कांबळी यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेला पाच दिवस झाले तरी कंपनीच्या विरोधात गुन्हा न नोंदवता स्थानिकांवर गुन्हा नोंदवल्याप्रकरणी गोवा प्रदेश काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक बनले व त्यांनी थेट पेडणे पोलीस स्थानकावर धडक देत पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांना धारेवर धरले. कांबळी यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याबरोबरच कंपनीच्या विरोधात अनेक गुन्हे नोंदवण्यासाठी वेगवेगळ्या खात्याकडे दाद मागणार. शिवाय न्यायालयात जाण्याचा इशारा काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी दिला. काँग्रेस नेत्यांनी धारगळ अपघात प्रकरणी चर्चा करण्यासाठी पेडणे पोलीस उपअधीक्षक राजेशकुमार यांना भेटण्याची विनंत केली होती. त्यानुसार त्यांना मंगळवारची वेळ दिली असताना उपअधीक्षक जी 20 कार्यक्रमाला पणजीत गेल्याने भेटू शकले नाहीत. यामुळे काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी थेट पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांचे केबिन गाठले आणि त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. मोपा विमानतळ लिंक रस्ता करणाऱ्या कंपनीकडे किती कामगार आहेत? किती वाहने काम करतात? त्यांच्याकडे परवाने आहेत का? त्यांचा तपशील पोलिसांकडे आहे की नाही? अशा प्रश्नांचा भडिमार काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी पोलीस निरीक्षकांवर केला.
यावेळी काँग्रेस सरचिटणीस जितेंद्र गावकर, प्रमेश मयेकर, प्रदीप हरमलकर, विजय भिके, उत्तर गोवा अध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, प्रणव परब, मांद्रे गट काँग्रेस अध्यक्ष नारायण रेडकर, पेडणे गट काँग्रेस अध्यक्ष कृष्णा नाईक, सुनील नाईक, नौशाद चौधरी, मिंगेल फर्नांडिस, बाबूसो तळकर, रामचंद्र पालयेकर, संजय बर्डे, फ्रान्सिस फर्नांडिस, राजेंद्र रेडकर, प्रकाश किनळेकर, महेश कांबळी, प्रतिक्षा नाऊलकर खलप, अक्षय नाईक आदी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. पेडणे पोलिसांनी त्वरित कंपनीच्या विरोधात गुन्हा नोंदवावा, ट्राफिक पोलीस, वाहतूक खाते, सार्वजनिक बांधकाम रस्ता विभाग यांच्यावरही गुन्हा नोंदवण्याची गरज आहे. ही सर्व सरकारी खाते या अपघाताला कारणीभूत असल्याचे सांगून लोकांना मारण्याचे सत्र सध्या विद्यमान सरकारने चालवले आहे. अपघातानंतर मदतीसाठी धाऊन आलेल्या स्थानिकांवर गुन्हे नोंदवणे, त्यात तीर्थयात्रेला गेलेल्या दोन व्यक्तींचाही समावेश असणे हे संतापजनक आहे, असे अमित पाटकर म्हणाले. स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर हे राजकारण करत आहेत. त्यांनी दिलेला शब्द का पाळला नाही? जोपर्यंत पीडिताला न्याय देत नाही व संशयिताला अटक होत नाही तोपर्यंत लिंक रस्त्याचे काम बंद ठेवले जाणार असे सांगितले असताना ते काम कसे सुऊ? आतापर्यंत याठिकाणी अपघातात किती जणांचा मृत्यू झाला याची माहिती आमदाराला आहे का? असा सवाल अमित पाटकर यांनी उपस्थित केला.
आमदाराची भाषा दादागिरीची : अॅड. जितेंद्र गावकर
काँग्रेस सरचिटणीस जितेंद्र गावकर यांनी, अपघातानंतर आमदार प्रवीण आर्लेकर घटनास्थळी जाऊन जीत दादागिरीची भाषा वापरली त्याचा अनुभव अनेक नागरिकांनी घेतलेला आहे. शिवाय प्रशांत धारगळकर या दलित समाजाच्या युवकालाही त्यांनी अपमानास्पद वागणूक दिली होती. आमदार प्रवीण आर्लेकर दादागिरी करत असतील तर आम्ही कदापही गप्प राहणार नाही, असा इशारा जितेंद्र गावकर यांनी दिला. स्थानिकांवर जे गुन्हे नोंदवले गेले ते गुन्हे त्वरित मागे घ्यावे यासाठी यावेळी काँग्रेस पक्षातर्फे पेडणे पोलिसांना निवेदन सादर केले. यावेळी विजय भिके, नारायण रेडकर, प्रदीप देसाई, प्रदीप हरमलकर आदींनी विचार मांडले.









