गोपाळ परब यांचे गौरवोद्गार : पालये येथे क्रांतिदिन सोहळा
पालये : 18 जून 1946 रोजी मडगाव येथे डॉ. राम मनोहर लोहिया यांनी पोर्तुगीज राजवटीविरुद्ध चळवळ सुरू केली. त्यांनी पेटविलेली ठिणगी गोमंतकीयांच्या ह्दयात मोठ्या ज्वाळांमध्ये बदलली. त्यांनी पोर्तुगीज राजवटीविरोधात स्वातंत्र्याची मशाल पेटविली. त्यांच्या विरोधात लढण्यासाठी गोमंतकीयांचे धैर्य वाढविले आणि त्यामुळेच 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा मुक्त झाला, असे प्रतिपादन पालये गावचे माजी सरपंच गोपाळ परब यांनी केले. पालये येथील श्री भूमिका वेताळ मंदिरात शेटगांवकर परिवारातर्फे आयोजित क्रांतिदिन तसेच दिवंगत स्वा.सै. कृष्णा शेटगावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. या सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर श्री भूमिका वेताळ देवस्थान समितीचे अध्यक्ष एकनाथ तुकाराम परब, ज्येष्ठ कलाकार ज्ञानेश्वर पालयेकर, माजी पंचायत सचिव रमेश ऊर्फ चंद्रकांत तिळवे, ज्येष्ठ गायककलाकार शंकर कदम, दिवंगत स्वा. सै. शंकर गाड (मोपा) यांच्या कन्या शांती किशोर तिळवे, विनायक शेटगावकर तसेच नाईकवाडा सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या प्रमुख अर्चना तुकाराम परब, शिक्षिका फेलिसिया फर्नांडिस, स्नेहा बुडके, मधलावाडा सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या प्रमुख मीना फर्नांडिस, शिक्षिका विद्या न्हानजी, सरकारी प्राथमिक विद्यालय किरणपाणीच्या प्रमुख सुमिता भिवा परब, शिक्षिका सपना सावंत, आयडियल इंग्लिश हायस्कूलच्या शिक्षिका उर्वी परब, व्हेनिझा पिंटो, ब्रिगिटा फर्नांडिस, प्रणाली गावडे, भूमिका इंग्लिश हायस्कूलच्या ज्येष्ठ शिक्षिका नीना मांद्रेकर, सुखदा परब नाईक, शिक्षक प्रसाद परब यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना गोपाळ परब यांनी आपल्या भाषणात गोवा मुक्तिसंग्रामावेळी पालये गावातील स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची माहिती दिली. तसेच हुतात्मा पन्हालाल यादव यांच्या कार्याविषयीही माहिती दिली. त्यांच्या कार्याचे स्मरण होणे अत्यावश्यक आहे, असे ते म्हणाले. गोवा मुक्तिसंग्राम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे अत्यावश्यक आहे, असे नीना मांद्रेकर म्हणाल्या. अर्चना परब, सुमिता परब, ज्ञानेश्वर पालयेकर, चंद्रकांत तिळवे यांचीही यावेळी भाषणे झाली. व्यासपीठावरील मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन प्रमोद शेटगावकर, हनुमंत शेटगावकर तसेच विद्यार्थ्यांनी स्वागत केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. तसेच प्रमुख पाहुणे पालयेचे माजी सरपंच गोपाळ परब यांनी स्वा. सै. दिवगंत कृष्णा शेटगावकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. मधलावाडा सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या प्रमुख मीना फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी गोवा क्रांतिदिनावर आधारित कार्यक्रम सादर केला. तसेच आयडियल इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गीत सादर केले. सूत्रसंचालन राजेश परब यांनी केले, तर हनुमंत शेटगावकर यांनी आभार मानले. दरम्यान, या कार्यक्रमात शेटगावकर परिवारातर्फे विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.









