लाभार्थ्यांच्या घरकुलांचे स्वप्न अधुरे : अलारवाड ग्रामस्थांचा विरोध, कामाला चालना देण्याची गरज
बेळगाव : जमिनीचा अभाव, ग्रामस्थांचा विरोध आणि कागदपत्रांच्या समस्यांमुळे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जी+3 मॉडेल गृहप्रकल्प रखडला आहे. घरांच्या बांधकामासाठी आदेश देऊन एक वर्ष उलटले तरी अद्याप कामाला चालना मिळाली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांच्या घरकुलांचे स्वप्न अधुरे राहिले आहे. रखडलेल्या गृहप्रकल्पाला चालना देण्याची गरज लाभार्थ्यांतून व्यक्त होत आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकार्याने ही योजना राबविली जात आहे. महानगरपालिका व्याप्तीतील गोरगरीब जनतेला छप्पर मिळावे, या उद्देशाने ही योजना राबविण्यात आली होती. मात्र अद्याप कामाला प्रारंभ झाला नसल्याने लाभार्थ्यांना स्वत:च्या घरांपासून वंचित राहावे लागले आहे. या गृहप्रकल्पासाठी अलारवाड व अनगोळ येथील 21.24 एकर क्षेत्र निश्चित करण्यात आले होते. मात्र यापैकी 18 एकर क्षेत्रात गृहप्रकल्पाला अलारवाड ग्रामस्थांनी विरोध केला आहे. त्यामुळे ही योजना थांबली आहे. या योजनेसाठी केंद्र सरकार 22.66 कोटी, राज्य सरकार 23.47 कोटी, महापालिका 1.48 कोटी तर लाभार्थ्यांकडून 4.67 कोटी रुपये खर्ची घालण्यात येणार आहेत. यासाठी प्रकल्प अहवाल आणि निविदा मागविण्यात आल्या आहेत. शिवाय वर्क ऑर्डरदेखील जारी करण्यात आली आहे. मात्र जमिनीचा प्रश्न, ग्रामस्थांचा विरोध व अन्य कारणांमुळे सुमारे 1300 घरांचे बांधकाम रखडले आहे. दक्षिण मतदारसंघात 56 घरांच्या बांधकामांना सुरुवात झाली आहे. मात्र अलारवाड ग्रामस्थांनी विरोध केल्याने हा प्रकल्प थांबला आहे. दरम्यान या योजनेला विलंब झाल्याने बांधकाम साहित्याच्या खर्चात वाढ झाली आहे. बांधकाम साहित्य वाढल्याने एकूण बजेट वाढले आहे. त्यासाठी लाभार्थ्यांवरील आर्थिक बोजा कमी केला पाहिजेत. अपात्र लाभार्थ्यांना यादीतून वगळून नवीन लाभार्थ्यांची निवड करावी, अशी मागणी काहींनी केली आहे.
ग्रामस्थांच्या समस्या जाणून गृहप्रकल्पाला चालना देणार
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जी+3 मॉडेल घरांचे बांधकाम जमिनीचा प्रश्न आणि तांत्रिक अडचणींमुळे लांबणीवर पडले आहे. अलारवाड ग्रामस्थांच्या समस्या समजून घेऊन गृहप्रकल्पाला चालना दिली जाणार आहे.
– डॉ. रुद्रेश घाळी (मनपा आयुक्त)
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे
- गाव मंजूर घरे
- (जी+3)
- अलारवाड 1260
- उद्यमबाग 104
- अनगोळ 64
- अनगोळ नगर 56
- एकूण 1484









