हनुमाननगर परिसरात जलवाहिनीसाठी खोदाई, पैशाचा चुराडा
बेळगाव : स्मार्टसिटी अंतर्गत रस्ता, गटारी, जलवाहिन्या आणि इतर विकास साधला जात आहे. शहरातील विविध भागात जलवाहिन्या घालण्याचे काम सुरू आहे. हनुमाननगर परिसरात जलवाहिन्या घालण्यासाठी खोदाई केली जात आहे. मात्र जलवाहिन्यांचा विकास अन् रस्ता भकास असे चित्र पहावयास मिळत आहे. शहर आणि उपनगर परिसरात सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिन्यांचे काम हाती घेण्यात आले आहे. यापूर्वी अमृत योजनेंतर्गत शहरातील गटारी, रस्ते, जलवाहिन्या आणि ड्रेनेजचा विकास साधण्यात आला होता. मात्र नवीन वसाहत आणि उपनगरात जलवाहिनी आणि ड्रेनेज वाहिन्या घालण्यात आल्या नव्हत्या. मात्र आता उपनगर परिसरात जलवाहिन्या घातल्या जात आहेत. उपनगरातील हनुमाननगर, कुवेंपूनगर, सह्याद्रीनगर परिसरात जलवाहिन्या घातल्या जात आहेत. मात्र नुकताच केलेल्या रस्त्याचे नुकसान होऊ लागले आहे. रस्त्यांचा विकास झाला, मात्र इतर विकासासाठी रस्त्यांची खोदाई सुरू आहे. पुन्हा रस्ताकाम करावा लागणार आहे. त्यामुळे पैशाचा चुराडाही होत आहे.रस्ते करण्यापूर्वीच जलवाहिनी, ड्रेनेज व इतर कामे होणे आवश्यक आहे. मात्र रस्ता केल्यानंतरच जलवाहिनी आणि इतर कामांसाठी रस्ताखोदाई होऊ लागल्याने समस्या वाढल्या आहेत.









