स्थानिक नागरिकांची मागणी, मनपा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
बेळगाव : शहरामध्ये पाण्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी समस्या सोडविण्यासाठी शहरामध्ये बंद असलेल्या कूपनलिकांची दुरुस्ती करावी, अशी सूचना दिली आहे. मात्र शहरातील कूपनलिकांकडे महानगरपालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे शहरातील जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वडगाव येथील रयत गल्लीमध्ये कूपनलिका बंद पडली आहे. बऱ्याच दिवसांपासून ही कूपनलिका बंद असून त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिक करत आहेत. दरम्यान, रयत गल्ली, वडगाव परिसरामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने राहत आहेत. त्यामुळे त्यांनी जनावरे पाळली आहेत. त्यांना अधिक पाणी लागते. मात्र पाणी मिळत नसल्यामुळे पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. गल्लीमध्ये कूपनलिका असूनही ती बंद असल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. याचबरोबर सार्वजनिक विहीर आहे. त्याठिकाणी पंप असला तरी पाणी कमी दाबाने येत आहे. परिणामी या परिसरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. याबाबत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र त्याकडे या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. महापालिकेमध्ये सतीश जारकीहोळी यांनी बैठक घेतली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनीही बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या. मात्र अजूनही पाण्याच्या समस्येबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने घेतले नसल्याचे दिसून आले आहे. या प्रकारामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. रयत गल्ली, वडगाव येथील कूपनलिकाची दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.









