ग्रामस्थ-यात्रा कमिटीतर्फे आयोजन : लक्ष्मीयात्रेसाठी सर्वप्रकारचे साहाय्य करण्याचे आश्वासन
खानापूर : करंबळ (ता. खानापूर) शहराजवळच्या प्रमुख पाच गावची ग्रामदेवता असणाऱ्या लक्ष्मीदेवीची यात्रा पुढीलवषी 28 फेब्रुवारी ते 7 मार्च 2024 या दरम्यान साजरी होणार आहे. तब्बल 19 वर्षांनंतर यात्रा होणार असल्याने भाविकांची गर्दी होणार आहे. यात्रेपूर्वी पाचही गावातील रस्ते, गटारी, पाणीपुरवठा, स्वच्छतेची कामे प्राधान्याने मार्गी लावली जातील, अशी ग्वाही आमदार विठ्ठल हलगेकर यांनी दिली. यावेळी करंबळ येथे त्यांचा ग्रामस्थ आणि लक्ष्मीदेवी यात्रा कमिटीच्यावतीने सत्कार करण्यात आला. आमदार विठ्ठल हलगेकर पुढे म्हणाले, पाच गावांना जोडणारे यात्रेचे प्रमुख ठिकाण करंबळ आहे. येथील गावांना जोडणारे रस्ते सुस्थितीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ऊमेवाडी ते होनकल रस्त्याचे खडीकरण केले जाईल. पाचही गावातील अंतर्गत रस्त्यांची दुऊस्ती करून जलजीवन मिशनच्या कामासाठी ज्या रस्त्यांची खोदाई केली आहे. त्यांची त्वरित दुऊस्ती करण्यात येणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर पुढील गळीत हंगामात पाच गावांतील उसाची लवकर उचल करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी यात्रा कमिटीचे कार्याध्यक्ष महादेव घाडी म्हणाले, करंबळ, ऊमेवाडी, कौंदल, होनकल, जळगे या पाच गावची ग्रामदेवता लक्ष्मीदेवीची यात्रा 2023 साली होणार असल्याने भाविकांची गर्दी होणार आहे. त्याचा विचार करून आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी ग्राम पंचायत व तालुका प्रशासनाने सहकार्य करावे, असे सांगितले. यावेळी अध्यक्ष सातेरी घाडी, रामचंद्र पाटील, सूर्याजी पाटील, बुद्धापा चौगुले, दे. भ. घाडी, टोपान्ना पाटील, नामदेव गुरव, रमेश घाडी, जयवंत पाटील आदी नागरिक उपस्थित होते.









