जागा, अनुदानाचा अभाव : महिला-बालकल्याण खाते लक्ष देणार का?
बेळगाव : शासनाच्या अनुदानाचा व जागेचा अभाव यासह इतर कारणांमुळे शहरातील 323 अंगणवाड्या भाडेतत्त्वावरील इमारतींमध्ये भरविण्यात येत आहेत. दरम्यान नवीन इमारतींसाठी जागा मिळत नसल्याने वर्षानुवर्षे अंगणवाड्या खासगी इमारतींतच भरू लागल्या आहेत. त्यामुळे स्वत:च्या इमारतीत अंगणवाड्या कधी भरणार? असा प्रश्न अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना पडला आहे. जिल्ह्यात 5 हजार 331 अंगणवाड्या आहेत. यापैकी काही शहरात तर काही ग्रामीण भागात आहेत. शिवाय 325 नवीन अंगणवाड्यांची भर पडली आहे. दरम्यान ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरातील अंगणवाड्यांचे भाडे अधिक आहे. त्यामुळे शहरातील अंगणवाड्यांच्या भाडोत्री इमारतींसाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. परिणामी खात्याच्या तिजोरीवर अधिक भार पडत आहे.
विकासाची अपेक्षा
शहरातील भाडोत्री इमारतींमधील अंगणवाड्यांबाबत महापालिकेच्या सभागृहात चर्चा झाली. शिवाय जागा शोधण्यासाठी मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र, अद्याप जागा मिळालेली नाही. त्यामुळे अंगणवाड्यांचे यंदाचे शैक्षणिक वर्षदेखील भाडे तत्त्वावरील इमारतींमध्येच जाणार आहे. त्याबरोबर ग्रामीण भागात भाडोत्री अंगणवाड्यांची संख्या अधिक आहे. महिला व बालकल्याण खाते लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अंगणवाड्याचा विकास होईल, अशी अपेक्षा अंगणवाडी सेविका आणि पालकांतून व्यक्त होत आहे.
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
जिल्ह्यात 1348 अंगणवाड्या भाडोत्री इमारतीत भरविल्या जात आहेत. त्यामुळे महिला व बालकल्याण खात्यावर आर्थिक बोजा वाढला आहे. स्वत:च्या इमारती झाल्यास भाडे देण्यासाठी जाणारा निधीदेखील वाचणार आहे. त्यामुळे येत्या काळात मंत्री आणि महिला व बालकल्याण खात्याचे अधिकारी याकडे लक्ष देणार का? हे पहावे लागणार आहे.









