वृत्तसंस्था/ माँट्रियल
रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने येथे झालेल्या कॅनेडियन ग्रां प्रि फॉर्म्युला वन शर्यतीचे जेतेपद पटकावत चॅम्पियनशिप रेसमधील आघाडी आणखी वाढविली. रेड बुलचे हे एकूण 100 वे जेतेपद आहे. अॅस्टन मार्टिनच्या फर्नांडो अलोन्सोने दुसरे स्थान मिळविले. रेड बुलने या मोसमातील शर्यतींवर वर्चस्व गाजविले असून आतापर्यंत झालेली जवळपास प्रत्येक शर्यत त्यांनी जिंकली आहे.
35 वर्षीय व्हर्स्टापेनने प्रारंभापासून अखेरपर्यंत आघाडी कायम राखत ही शर्यत जिंकली. कारकिर्दीतील त्याचे हे 41 वे जेतेपद असून त्याने ब्राझीलचा तिहेरी वर्ल्ड चॅम्पियन आयर्टन सेनाशी बरोबरी साधली आहे. अॅस्टन मार्टिनच्या अलोन्सोने या मोसमात आठ शर्यतीपैकी सहाव्यांदा पोडियमवर स्थान मिळविले. मर्सिडीजच्या लेविस हॅमिल्टनने तिसरे, फेरारीच्या चार्लस लेक्लर्कने चौथे, फेरारीच्याच कार्लोस सेन्झने पाचवे स्थान मिळविले.
व्हर्स्टापेनने कॅनडात एकूण सहावे व सलग चौथ्यांदा जेतेपद मिळविले. रेड बुलचा आणखी एक ड्रायव्हर सर्जिओ पेरेझला सलग तिसऱ्यांदा पोडियमवर स्थान मिळविता आले नाही. पेरेझने सहावे स्थान मिळविले असले तरी ड्रायव्हर्स क्रमवारीत त्याने दुसरे स्थान कायम राखले आहे. 195 गुण मिळविणाऱ्या व्हर्स्टापेनपेक्षा तो 69 गुणांनी मागे आहे. अॅस्टन मार्टिनचा दुसरा ड्रायव्हर लान्स स्ट्रोलने नववे, विल्यम्सच्या अॅलेक्स अल्बनने सातवे स्थान मिळविले. त्यालाच दिवसातील सर्वोत्तम ड्रायव्हरचा बहुमान मिळाला.









