भारत-अमेरिकेच्या प्रस्तावावर वापरला नकाराधिकार
वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ
दहशतवादाच्या मुद्द्यावरून चीनचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. चीनने लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी साजिद मीरला जागतिक दहशतवाद्यांच्या सामील करण्याची मागणी करणाऱ्या भारत अन् अमेरिकेच्या प्रस्तावावर नकाराधिकार वापरला आहे. अमेरिकेने साजिद मीद विरोधात 5 दशलक्ष डॉलर्सचे इनाम घोषित केले आहे.
मागील वर्षी सप्टेंबरमध्ये देखील चीनने संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत सामील करण्याच्या प्रस्तावावर आडकाठी आणत तो रोखला होता. चीनने यावेळी देखील यासंबंधीचा प्रस्ताव रोखला आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांना काळ्या यादीत सामील करण्याचे प्रस्ताव चीन वारंवार रोखत आहे.
मुंबईवरील हल्ल्यांचा गुन्हेगार
दहशतवादी साजिद मीर हा 26/11 च्या मुंबईवरील हल्ल्यांप्रकरणी वाँटेड आहे. पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाने 2008 मध्ये दहशतवाद्यांना मुंबईत पाठवून हे हल्ले घडवून आणले होते. दहशतवाद्यांनी हॉटेल, रुग्णालय, कॅफे, रेल्वे स्थानकासमवेत अनेक ठिकाणांना लक्ष्य केले होते. या हल्ल्यांमध्ये 170 हून अधिक जण मृत्युमुखी पडले होते. या हल्ल्यांमध्ये अमेरिकेचे 6 नागरिक मारले गेले होते. दहशतवादी मीरने या हल्ल्यांसाठी कट रचला होता. याचबरोबर साजिद मीरने 2008 आणि 2009 दरम्यान डेन्मार्कमध्ये एका वृत्तपत्राच्या कर्मचाऱ्यांवर दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचला होता.
अमेरिकेकडून अटक वॉरंट
21 एप्रिल 2011 रोजी मीरविरोधात अमेरिकेच्या न्यायालयात आरोप निश्चित करण्यात आले होते. विदेशात शासकीय संपत्तीला नुकसान पोहोचविण्याचा कट राणे, दहशतवाद्यांना मदत पुरविणे, अमेरिकेच्या नागरिकाची हत्या करणे, सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्याचा आरोप त्याच्यावर होता. मीर विरोधात अमेरिकेने 22 एप्रिल 2011 रोजी अटक वॉरंट जारी केले होते.









