उष्माघाताचे अनेक बळी : केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशाच्या अनेक राज्यांमध्ये वाढलेली उष्णता आणि उष्माघातामुळे अनेकांचा बळी गेल्याने केंद्र सरकार सक्रीय झाले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी उच्चस्तरीय बैठक घेतली असून यात उष्णतेच्या लाटेमुळे प्रभावित राज्यांमध्ये केंद्रीय पथके पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर केंद्र सरकारकडून संबंधित राज्यांना सर्व प्रकारची मदत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
उष्णतेच्या लाटेमुळे प्रभावित राज्यांच्या संबंधित खात्यांचे मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत बुधवारी एक बैठक होणार आहे. तर मंगळवारच्या बैठकीत हवामान विभाग, आपत्ती व्यवस्थापन तसेच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेत आरोग्यमंत्र्यांनी अनेक निर्णय घेतले आहेत.

ओडिशा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तेलंगणा, बिहार आणि झारखंड यासारख्या राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक प्रकोप दिसून येत आहे. उष्णतेच्या लाटेचा प्रकोप करण्यासाठी पावले उचलली जावीत, अशी सूचना केंद्र सरकारकडून बुधवारच्या बैठकीत राज्यांना केली जाणार आहे.
उष्माघाताचे बळी रोखण्यासाठी हवामान विभाग, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर संबंधित विभागांसोबत मिळून दीर्घकालीन अन् लघुकालीन योजना तयार करण्याचा निर्देश इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चला देण्यात आला आहे.
हवामान विभागाचा पूर्वानुमान पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फेब्रुवारी महिन्यात एक बैठक घेतली होती. या बैठकीत पंतप्रधानांनी सर्व राज्यांना उष्माघातापासून बचावासाठी कृती कार्यक्रम तयार करण्याची सूचना केली होती. हे पाहता आरोग्य मंत्रालयाने नॅशनल अॅक्शन प्लॅन ऑफ हीट रिलेटेड इलनेसविषयी पूर्वीच तयार केली होती. फेब्रुवारीच्या अखेरीस आरोग्य मंत्रालयाकडून सर्व राज्यांना दिशानिर्देश जारी करण्यात आले होते. यात उष्माघातामुळे कुणाचाच मृत्यू होऊ नये म्हणून राज्य सरकारांनी योग्य पावले उचलावीत असे म्हटले गेले होते.









