नववी, अकरावीच्या पुस्तकांची प्रचंड कमतरता : पुस्तके मिळविण्यासाठी विद्यार्थी, पालकांची धडपड
मडगाव : यंदाच्या शैक्षणिक वर्षातही पाठ्यापुस्तकांचा पुन्हा एकदा गेंधळ घालण्यात आलेला आहे. इयत्ता 9वी, आणि 11 वी विज्ञान शाखेच्या पुस्तकांची प्रचंड कमतरता असल्याची माहिती पुस्तक विक्रेत्यांनी दिली. यंदा पाठ्यापुस्तकांच्या किंमतीत 30 ते 40 टक्के वाढ झालेली आहे. गेल्या काही वर्षापासून पाठ्यापुस्तकांचा गोंधळ घातला जात आहे. शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीलाच विद्यार्थ्यांना पाठ्यापुस्तके उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थी व पालक पाठ्यापुस्तके मिळविण्यासाठी धडपड करीत असतात. मडगावातील पुस्तक विक्रेत्यांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, यंदा इयत्ता 9वी व 11 वी विज्ञान शाखेच्या पाठ्यापुस्तकांची प्रचंड कमतरता आहे. पुस्तक प्रकाशक तीन-चार महिन्यापूर्वीच किती प्रमाणात पाठ्यापुस्तके लागणार याची ढोबळ माहिती घेतात. त्याप्रमाणे विक्रेते आपली ऑर्डर देतात. पण, प्रत्यक्षात तेवढी पुस्तके उलपब्ध होत नाहीत.
खात्याचे दरवर्षी होतेय दुर्लक्ष
वास्तविक शिक्षण खात्याकडे विद्यार्थ्यांची संपूर्ण आकडेवारी उपलब्ध असते. त्या प्रमाणे, आठवी नंतर प्रत्येक इयत्तेत किती प्रमाणात पाठ्यापुस्तके लागणार याचा तपशील जर पुस्तक प्रकाशकांना दिला तर पाठ्यापुस्तकांची कमतरता भासण्याचा प्रकार कायम स्वरूपी सुटू शकतो. मात्र, याकडे दरवर्षी दुर्लक्ष होत असल्याने शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला तरी विद्यार्थ्यांना पाठ्यापुस्तके मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होते असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
अकरावी विज्ञान पुस्तकांची करमतरता
आठवी नंतर नववीच्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती असेल हे ग्रहित धरून 90 टक्के पुस्तके जरी प्रकाशित केली तरी बहुसंख्य विद्यार्थ्यांना पाठ्यापुस्तके सहजरित्या उलपब्ध होऊ शकतात याकडे पुस्तक विक्रेत्यांनी लक्ष वेधले आहे. यंदा 11वी विज्ञान शाखेच्या पुस्तकांची प्रचंड कमतरता आहे. ही पुस्तके नेमकी कधी उलपब्ध होईल हे सांगणे कठीण असल्याचे मत पुस्तक विक्रेत्यांनी व्यक्त केले आहे. इयत्ता 9वीची इंग्रजी, हिंदी व हिस्ट्री पुस्तके विक्रेत्यांकडे उपलब्ध नाहीत. 1994 पासून आज पर्यंत पाठ्यापुस्तके कधीच एकाचवेळी उपलब्ध झालेली नाहीत अशी माहिती विक्रेत्यांनी दिली. पाठ्यापुस्तके निर्धारित वेळेत का प्रकाशित केली जात नाही असा सवाल ही पुस्तक विक्रेत्यांनी उपस्थित केला आहे. दिल्ली व महाराष्ट्रातील पुस्तक प्रकाशक गोव्यात येतात व आपली कार्यालये खोलतात. नंतर पुस्तके दिल्ली व महाराष्ट्रात प्रकाशित करून गोव्यात आणतात. त्यामुळे गोंधळात अधिक भर पडते असे मतही विक्रेत्यांनी व्यक्त केले आहे.
यंदा 30 टक्क्यांपेक्षा अधिक दरवाढ
यंदा पाठ्यापुस्तकांच्या किंमतीत 30 ते 35 टक्के दरवाढ झाल्याची माहिती पुस्तक विक्रेत्यांनी दिली आहे. विशेष करून इयत्ता 9वीच्या हिस्ट्री (इतिहास) पुस्तकाच्या किंमतीत प्रचंड वाढ झालेली आहे. गेल्यावर्षी या पुस्तकाची किंमत 90 रूपयांच्या घरात होती. ती यंदा 190 रूपयाच्या घरात पोचली आहे. त्याच बरोबर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पुस्तकाच्या पानाची संख्याही कमी झालेली आहे.









