मडगावच्या जाहीर सभेत ठराव
मडगाव : म्हादई नदीचे पाणी वळविण्यासाठी ‘डीपीआर’ला दिलेल्या सर्व मान्यता त्वरित रद्द कराव्यात असा ठराव काल मडगावात झालेल्या ‘सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा’च्या जाहीर सभेत घेण्यात आला. मडगावच्या लोहिया मैदानाजवळ रस्त्यावरच ही सभा घेण्यात आली. 18 जून क्रांती दिनाचे औचित्य साधून ही जाहीर सभा लोहिया मैदानाजवळ घेण्यात आली. या जाहीर सभेला चांगला प्रतिसाद लाभला. सेव्ह म्हादई, सेव्ह गोवाचे अॅड. हृदयनाथ शिरोडकर यांनी म्हादईच्या मुद्दावरून भाजप सरकार लोकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. म्हादई नदीचे पाणी वळविण्यासाठी दिलेला डीपीआर रद्द करण्यासाठी गोवा सरकार सर्वोच्च न्यायालयात का दाद मागत नाही असा सवाल त्यांनी यावेळी केला. जर सरकारने डीपीआर रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असती तर सरकारची भूमिका स्पष्ट झाली असती असे अॅड. शिरोडकर म्हणाले. गोव्यात आज मोठ्या प्रमाणात जंगले उद्धस्त केली जात आहे. काँक्रिटची जंगले उभारली जात आहे. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. सरकारचे यावर नियंत्रण नाही. यंदा पाऊसही बरोबर पडत नाही. त्यामुळे पाण्याची टंचाई सर्वांना सहन करावी लागत आहे आणि अशा प्रसंगी जर आम्ही जागृत झालो नाही तर भविष्यात गंभीर परिणाम सहन करावे लागणार आहे. आम्ही सर्व हवेदावे बाजूला ठेऊन म्हादईच्या लढ्यात एकत्रित आलो पाहिजे असे ते म्हणाले.
यावेळी फा. बॉलमेक्स परेरा या सभेत बोलताना म्हणाले की, गोवा आणि महाराष्ट्र सरकार एकत्र येऊन म्हादईचा लढा देणार असल्याचे विधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. या विधानामागे राजकारण आहे. कारण, कर्नाटकात आत्ता काँग्रेसचे सरकार आल्याने श्री. शिंदे यांनी हे विधान केले आहे. पूर्वी गोवा, महाराष्ट्र व कर्नाटक असे तिहेरी इंजिनचे भाजपचे सरकार होते. त्यावेळी अशी विधाने का झाली नाही. अशा विधानावर गोव्यातील जनता विश्वास ठेवणार नाही. अशी विधाने करून लोकांमध्ये फुट पाडण्याचे काम केलं जात आहे. आम्ही भारतीत आहोत. सर्व जाती-धर्माचे लोक या ठिकाणी राहतात. त्याच्यात फुट पाडण्याचा प्रयत्न कुणीच करू नये. या सभेत दक्षिण गोव्याच्या विविध भागातून आलेल्या लोकांनी आपआपल्या भागातील पाण्याच्या समस्यांवर प्रकाश टाकल. सांगेतील कुर्डी ग्रामस्थांनी मोठ्या त्याग केल्यामुळे साळावली धरण निर्माण झाले. पण, आज कुर्डीच्या ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध सरकार अपयशी ठरल्याचे सांगण्यात आले. पिण्याचे पाणी व शेती-बागायतीसाठी पाणी दिले जाईल असे आश्वासन सरकार तर्फे देण्यात आले. पण, या आश्वसनाची पूर्तता झालेली नाही असे यावेळी सांगण्यात आले. डायना तावारीस यांनी आपले पठार संवर्धन करण्याचे महत्व सांगितले. पठारावर पावसाचे पाणी साठविले जाते. ते दगडातून पाझरून आपल्याला नैसर्गिक झरे मिळतात. त्यामुळे दगडांचे संवर्धन करण्याचा सल्ला दिला. यावेळी शंकर पोलजी यांनी ही आपले विचार मांडले. सभेला महिलांनी पाण्याच्या रिक्त बादल्या व घागरी घेऊन उपस्थिती लावली होती. ही सभा लोहिया मैदानावर घेतली जाणार असल्याचे अगोदर घोषित करण्यात आले होते. परंतु लोहिया मैदानावर 18 जून क्रांती समितीचा कार्यक्रम सुरू असल्याने ही सभा लोहिया मैदानाजवळ घेणे भाग पडले. कुठलाच अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
नद्यांचे पाणी वळवू देणार नाही
आम्ही म्हादई नदी आणि गोव्यातील इतर सर्व नद्यांचे संरक्षण आणि संवर्धन करू आणि आमच्या नद्यांचे पाणी कोणालाही वळवू देणार नाही. आम्ही आमच्या गावांचे आणि गोवा राज्याच्या जलस्त्रोतांचे संरक्षण आणि संवर्धन करू तसेच आपल्या टेकड्या, पठार, जंगले, फळबागा, शेत यांचा वापर बदलू देणार नाही असे ठराव यावेळी घेण्यात आले. ‘प्रवाह’सह म्हादई नदी वळविण्याच्या सर्व समित्या त्वरित बरखास्त कराव्यात, गोवा सरकारने प्रथम आमची भूजल आकारणी क्षेत्रे, जलचर आणि भूपृष्ठावरील जलस्त्रोतांचा, जलधारण क्षमता आणि प्रवाह दर यांचा अभ्यास आणि नकाशा तयाक केला पाहिजे. आमच्या पूर प्रतिबंधक संसाधनांचा अभ्यास आणि नकाशा तयार केला पाहिजे आणि आमच्या नद्यांचा किमान पर्यावरणीय प्रवाह निश्चित केला पाहिजे असा ठराव घेण्यात आला.









