प्रा. सुभाष वेलिंगकर यांचे आवाहन
तिसवाडी : एखाद्या प्राथमिक शाळेच्या प्रांगणात हुतात्मा स्मारक असणे ही भाग्याची गोष्ट आहे. गोवा मुक्त होण्यासाठी केवळ गोवाच नाही तर देशभरातल्या स्वातंत्र्यसैनिकांनी योगदान दिले आहे. अमानुष अत्याचार सहन केले. जिवंत जाळले गेले. शरीराचे अवयव पिरगळून तोडण्यात आले. हा इतिहास आपण अभ्यासला पाहिजे. अशा हुतात्मा स्मारकाला आपण रोज पुजले पाहिजे, असे मत प्रा. सुभाष भास्कार वेलिंगकर यांनी व्यक्त केले. करमळी सरकारी प्रा. शाळेच्या प्रांगणात करमळी नागरिक समितीद्वारा आयोजित हुतात्म्यांच स्मरण आणि त्यांना वंदन या कार्यक्रमात वेलिंगकर बोलत होते. व्यासपीठावर स्थानिक सरपंच कुष्टा सालेलकर, उपसरपंच मुरगावकर, पालक शिक्षक संघाच्या अध्यक्ष भजनी वामन वरगावकर आणि विष्णू खोलकर उपस्थित होते. सूत्रसंचालन हरिश्चंद्र नाईक यांनी तर आभार भजनी वरगावकर यांनी मानले. कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









