सुधाकर काशीद,कोल्हापूर
Kolhapur Historical News : कोल्हापूर किती प्राचीन आहे याचा अस्सल पुरावा असलेल्या आठ वस्तू जगभरातील लोकांना पाहण्यासाठी साता समुद्रापार नेल्या जात आहेत.पण ज्या वस्तू आपल्या कोल्हापुरात आहेत,कोल्हापूरच्याच आहेत त्या आपल्या जवळ टाऊन हॉलमध्ये आहेत.पण दिवसातून फक्त 70 ते 80 जणांच्या पलीकडे या प्राचीन वस्तू किंवा प्राचीन ठेवा पहाण्याची तसदी कोणी कोल्हापूरकर घेत नाहीत अशी परिस्थिती आहे.त्यामुळे कोल्हापूरच्या प्राचीन इतिहासाचा म्हणजे साधारण 2500 वर्षाचा इतिहास प्रथम प्रत्येक कोल्हापूरकरांनी जाणून घेण्याची पाहण्याची गरज आहे.
ज्या प्राचीन कोल्हापूरचे महत्त्व जगात आहे त्या कोल्हापुरचे महत्व आपण कोल्हापूरकर कधी जाणून घेणार हा विचार करायला लावणारा खरा प्रश्न आहे. वस्तुसंग्रहालयात पुरातत्व विभागाने वस्तू ,मूर्ती शिलालेख,भांडी,दागिने अशा स्वरूपात अगदी व्यवस्थित जतन करून ठेवला आहे.आणि तो पाहण्यासाठी सर्वांना खुला आहे.
कोल्हापुरातील ब्रह्मपुरी उत्खननात म्हणजे पंचगंगा नदी जवळच्या टेकडीवर मूळ कोल्हापूर होते.काही नैसर्गिक आपत्तीत ते गाडले गेले.तेथे झालेल्या उत्खननात अनेक वस्तू सापडल्या.गावाच्या रचनेचे अवशेष मिळाले.त्यातल्या काही वस्तू इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 200 या कालावधीतील आहेत.म्हणजेच अडिच हजार वर्षांपूर्वीचे आहेत.त्या वस्तू म्हणजे कोल्हापूर प्राचिन काळातही व्यापार,उद्योग अशा विविध क्षेत्रात कसे सक्षम होते त्याचे अस्सल पुरावे आहेत.त्या काळात कोल्हापुरात ओतकाम (फाउंड्री) करून केलेल्या काही वस्तू आहेत.म्हणजेच त्या काळातहो फाउंड्रीची हस्तकला कुशलता येथे होती याचे ते दाखलेच आहेत. या वस्तू म्हणजेच कोल्हापूरच्या अडीच हजार वर्षाच्या इतिहासाचे वस्तू रुपातील दस्तऐवज आहे.जगभरात पुरातत्व अवशेष इतिहासात त्याची दखल घेतली जाते. पण आपण कोल्हापूरकर याकडे आस्थेनेआणि दखल देतो? हे या प्रश्नाचे उत्तर या प्रश्नाचे उत्तर नक्कीच अस्वस्थ करून टाकणारे आहे.
या प्राचीन वस्तू पैकी समुद्रदेवता,हत्तीवरील स्वार.पाण्याच्या भांड्यात भांड्याची कडा,खेळण्यातली गाडी व मंगल प्रतीके या वस्तू काल न्युयॉर्ककडे रवाना झाल्या. तेथे जागतिक प्रदर्शनात या वस्तू ठेवल्या जाणार आहेत.तेथून त्या वस्तू कोरिया त जाणार आहेत.वर्षभर या वस्तू बाहेरच असणार आहेत.अर्थात त्यानिमित्ताने जगातील लोकांसमोर कोल्हापुरातील हा प्राचीन ठेवा जाणार आहे.
या वस्तू प्राचीन आहेत.कोल्हापूर तर त्याहून प्राचीन आहे.पण आता समोर किंवा सभोवती दिसते ते कोल्हापूर अशीच बहुतेकांची समजूत आहे.आपण आपले नातेवाईक कोल्हापुरात आली तर त्यांना आवर्जून अंबाबाईला नेतो.मिसळ,पांढरा तांबड्या रस्स्याची चव चाखायला देतो.रंकाळा,पंचगंगा, राजवाडा, पन्हाळा, जोतिबा दर्शन करून पाहुण्याला परत पाठवतो.पण कोणीही आपल्या पाहुण्यांना कोल्हापूरचा अडीच हजार वर्षाचा इतिहास दाखवायला टाऊन हॉलमध्ये नेत नाही. मुळात कोल्हापूरच्या बहुतेकांनी हा इतिहास जाणून घेतलेला नाही.त्यामुळे इतरांनाही आपण दाखवत नाही.रोज साधारण 50 ते60 जण व सुट्टीच्या दिवशी शंभर ते दीडशे जण वस्तुसंग्रहालयात येतात.वास्तविक सुट्टीच्या काळात एक नव्हे दोन नव्हे तब्बल तीन ते चार लाख लोक बाहेरून कोल्हापुरात आलेले असतात. वर वरचे कोल्हापूर पाहून ते परत जातात.आपण अडीच हजार वर्षापासूनचा इतिहास असलेल्या एका गावात आलो आहोत.खूप प्राचीन असे हे कोल्हापूर आहे हेच समजून न घेता कोल्हापूर पाहतात आणि परत निघूनही जातात.
या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचा इतिहास नव्या पिढीला जाणीवपूर्वक करून देण्याची गरज आहे.आणि हा सारा इतिहास आपल्याकडे उपलब्ध आहे पाहायला खुला आहे.आपण डोळे उघडे ठेवून हा इतिहास पाहणार का एवढाच खरा प्रश्न आहे.
पहा अस्सल इतिहास…
कोल्हापूर खूप प्राचीन आहे. ही प्राचीनता म्हणजे कोल्हापूरच्या समाज जीवनाची अस्सल प्रतीके आहेत. कोल्हापूरच्या प्राचीनते बद्दल पुरातत्त्व अभ्यासाच्या दृष्टीने जगभर कुतहुल आहे. आपण सर्वांनी हा इतिहास जाणून घ्यावा टाऊन हॉल वस्तुसंग्रहालयात हा ठेवा जतन करून ठेवला गेला आहे. या संग्रहालयातील वस्तू प्रदेशातील संग्रहात अभ्यास व निरीक्षणासाठी काही काळासाठी नेल्या जातात हे खरोखरच आपले भूषण आहे.
उदय सुर्वे,कोल्हापूर वस्तू संग्रहालय अभिरक्षक