पुणे / प्रतिनिधी :
देशातील बेरोजगारी आणि शेतीविषयी प्रश्न सोडून शिंदे-फडणवीस सरकार व के. चंद्रशेखर राव यांचा बीआरस पक्षही मोठय़ा प्रमाणात महाराष्ट्रात जाहिरातबाजी करताना दिसत आहे. अशा प्रकारे जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरू करण्यापेक्षा बेरोजगारी आणि महागाईच्या प्रश्नांकडे लक्ष द्या, असा खोचक सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला.
पुण्यातील मांजरीमधील वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट येथे कार्यकारिणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हेदेखील उपस्थित होते. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगावर आपली पकड मजबूत केल्यानंतर आता महाराष्ट्रात बीआरएस पक्ष आपला पाया बळकट करण्याच्या प्रयत्नात आहेत. मराठवाडय़ाच्या सीमाभागातल्या आजी-माजी नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिल्यानंतर बीआरसने पंढरपूरच्या वारीत मोठी जाहिरातबाजी केलेली पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर अजित पवार म्हणाले, आज राज्यातदेखील शिंदे-फडणवीस सरकारकडून मोठय़ा प्रमाणात जाहिराबाजी करून जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्यात येत आहे. वास्तविक त्यांनी महागाई आणि बेरोजगारी तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष दिले पाहिजे. आता काही राजकीय नेते मंडळींना वाटू लागले आहे, की राज्यात महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवली जाणार आहे. दुसरीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही एकत्र लढणार आहे. म्हणून पुढील पाच वर्षासाठी निवडणूक लढविता येणार नाही? आणि हा कार्यक्रम खूप मोठा आहे. म्हणून आम्हाला संधी मिळावी म्हणून काही नेते हे पक्ष प्रवेश करत आहेत.








