महाआघाडीवर नाही मुख्यमंत्र्यांचा प्रभाव
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमध्ये भाजप दिवसेंदिवस मजबूत होत आहे. 2024 मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप मोठे यश मिळविणार आहे. तर महाआघाडीला बिहारची जनताच धडा शिकविणार असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांनी सोमवारी केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अखिलेश सिंह यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची घोषणा केली होती. हे पाहता मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे आता महाआघाडीत काहीच चालत नसल्याचे स्पष्ट होते. सरकारमध्ये देखील त्यांचे म्हणणे कुणी ऐकून घेत नसावे. नितीश कुमार हे यापूर्वीच बिहारच्या राजकारणता अप्रासंगिक ठरले होते. बिहारच्या अस्मितेसठी आम्ही नितीश कुमारांपासून मुक्त बिहार निर्माण करू असे उद्गार चौधरी यांनी काढले आहेत.
नितीश कुमार हे केवळ हातचे बाहुले ठरले आहेत. याहून अधिक भूमिका त्यांना प्राप्त नाही. राज्यात बदल व्हावा अशी इच्छा आता जनतेचीच आहे. आणीबाणीच्या कालखंडात काँग्रेसने केलेल्या अत्याचारामुळे समाजवाद्यांचा राजकीय जन्म झाला होता, हेच कथित समाजवादी आता काँग्रेसच्या गोटात शिरले आहेत. 1974 च्या आंदोलनात सहभागी लालूप्रसाद यादव, नितीश कुमार हे आता काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसल्याची टीका चौधरी यांनी केली आहे.
2024 मध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन होणार आहे. तर 2025 मध्ये बिहारमध्ये भाजप सत्तेवर येणार आहे. भाजपने बिहारमध्ये अनेक जणांना मुख्यमंत्री केले. कर्पूरी ठाकूर हे दोनवेळा भाजपच्या सहकार्यामुळे मुख्यमंत्री झाले होते. नितीश कुमार हे देखील 5 वेळा भाजपच्या समर्थनामुळेच मुख्यमंत्री झाले आहेत. 2024 मध्ये संजद हाफ तर 2025 मध्ये पूर्णपणे साफ होणार असल्याचा दावा भाजप नेत्याने केला आहे.









