इच्छूक, नेते, उमेदवार आणि कार्यकर्त्यांत संभ्रम
कोल्हापूर : संतोष पाटील
राज्यात सत्तांतरानंतर नेत्यांची राजकीय अस्तित्वाची इर्षा, इच्छुकांच्या लोकसभा-विधानसभेच्या जोडण्या, प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढण्याची रणनिती, एका बाजूला विकासकामांची स्पर्धा तर दुसऱ्या बाजूला आपण राजकीय स्पर्धेत राहू की नाही याची चिंता, स्टेटसवरुन सामाजिक वाद, अशा दोलायमान वातावरणामुळे प्रथमच राजकीय संभ्रमावस्थेचं टोक गाठले आहे. कोणकोणत्या पक्षाचा उमेदवार असेल, मतदारांचा कौल काय असेल, नवी आघाडी आणि बिघाडी कशी होईल, यातूनही उमेदवारी मिळालीच तर विजयाची खात्री नाही, काहीशा स्तब्ध अशा राजकीय वातावरणात सर्वपक्षीय उमेदवारांसह नेत्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
मागील तीन वर्षात कधी नव्हे इतका राजकारणाने वेग घेतला आहे. भाजप शिवसेनेचा काडीमोड झाला, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अल्पकालीन बंड शमले तरी त्याचे प्रतिध्वनी आजही उमठत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेची महाविकास आघाडी होवून अडीच वर्ष राज्य केले. शिवसेनेत उभी फुट पडली. यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचे राज्यारोहन झाले. काँग्रेसमधील कोण फुटणार? राष्ट्रवादीतील मोठा गट भाजपसोबत जाणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीराख्यांची वाढणारी संख्या, भाजप-शिंदे गटातील वर्चस्ववादाचे राजकारण अशा एका मागून एक राजकीय भूकंप ठरणाऱ्या घटना घडल्या आणि घडत आहेत. याचे प्रतिध्वनी आता जिह्याच्या राजकारणातही खोलवर उमटू लागल्याचे दिसते. मागील काही महिन्यांपर्यंत चाचपडणाऱ्या शिंदे गटाच्या शिलेदारांचा आता आत्मविश्वास दुणावल्याचे चित्र आहे. आठवड्याला एका विकासकामांचा नारळ फुटत आहे. कामानिमित्त आशेने येणाऱ्यांची तितक्याच ताकदीने कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न शिंदे गटाचे नेते करत आहेत. सामाजिक आणि वैयक्तिक कामासाठी कधी नव्हे इतका पॉलिटीकल सपोर्ट मिळत असल्याने शिंदे गटाचे जोरदार कमबॅक होत आहे. शिंदे गटाच्या पाठीराख्यांचे मतांच्या राजकारणात जो निकाल लागायचा तो लागेल, मात्र बंडानंतर असणारी दुजाभावाची स्थिती आता बोथट झाल्याचे पहायला मिळते.
लांबलेला मंत्रीमंडळ विस्तार, राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची प्रलंबित यादी, महामंडळावर वर्णी आदींकडे शिंदेगट, भाजप आणि समर्थक इच्छुकांचा नजरा आहेत. एका बाजूला माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सहानूभूतीचे वारे प्रभावी आहे. तर दुसऱ्या बाजूला कर्नाटक विजयामुळे काँग्रेसच्ये शिडात जोमाची हवा भरली आहे. राष्ट्रवादीची भाजपसोबत जाण्याची चर्चा आणि त्यानंतरच खांदेपालट लक्षवेधी ठरले. अशा वातावरणात महाविकास आघाडीच्या जिह्यातील प्रत्येक नेत्याने घेतलेल्या प्रशासकीय निर्णयाचे ईडीसह तपास यंत्रणेकडून होऊ शकणारी संभाव्य उलटतपासणी आदींमुळे विरोधी नेत्यांत एकप्रकारची वेट अँन्ड वॉच अशीच भूमीका दिसते. यातच जिह्यात स्टेटस ठेवण्यावरुन सामाजिक वातावरण काळवंडले आहे. उद्याचे राजकारण कशी कूस बदलेलं याचा अंदाज लागत नसल्याने निवडणुका येईल तेव्हा ते तेव्हा पाहू, तूर्त वाद आणि आपण चार हात लांब राहिलेलं बरं अशीच सर्वपक्षीयांची मानसिकता दिसत आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील यांचे सर्व लक्ष पुण्यात असतानाही भाजपची जिह्यात राजकीय ताकद वाढली आहे, वाढत राहिल हे दाखवण्याचे मोठे आव्हान खासदार धनंजय महाडिक यांच्यापुढे आहे. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत दमदार कामगिरी करण्याचे लक्ष भाजपच्या टिमपुढे आहे. शासन आपल्या दारी उपक्रमाला तुफान गर्दी खेचत राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, खा. संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने, आ. प्रकाश आबिटकर, माजी मंत्री आ. राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार चंद्रदीप नरके यांची राजकीय स्थान ठरवणारे येणारे वर्ष आहे. महापालिकेसह विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत जिह्यातील राजकीय वजन कायम राखत आपली स्वतंत्र ओळख टिकवावी लागेल.
आ. सतेज पाटील आणि आ. पी.एन.पाटील यांच्या भोवतीच जिह्यातील काँग्रेसचे राजकारण फिरते. ज्या-ज्या वेळी हे दोन नेते एका व्यासपीठावर येतात तिथे काँग्रेस मित्रपक्षांना विजयाची दुप्पट आशा निर्माण होते. मात्र, कुंभी आणि राजाराम साखर कारखाना निवडणुकीवरुन या दोन नेत्यांसह कार्यकर्त्यांत पुन्हा शितयुध्द सुरू आहे. पक्षीय आणि संस्थात्मक राजकारणातील कटुता बाजूला ठेवून एकदिलाने काम करण्याचे आव्हान काँग्रेसपुढे आहे. आ. हसन मुश्रीफ या एकखांबी तंबूखाली जिह्यातील राष्ट्रवादीची वाटचाल सुरू आहे. कागल विधानसभेभोवतीच राष्ट्रवादीचे राजकारण फिरत असल्याचे वास्तव आहे. संस्थात्मक राजकारणातील राष्ट्रवादीची ताकद विधानसभा-लोकसभा निवडणुकीत दाखवावी लागेल. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला जिह्यातील आपली राजकीय ताकद पुन्हा मिळवण्याचे मोठे आव्हान आहे. महाविकास आघाडीवरच शिवसेनेची मदार आहे की स्वतंत्र ओळख कायम राखणार हे पाहणे औत्सुकतेचं ठरेल. गोकुळ, जिल्हापरिषद, जिल्हा बँक, बाजार समितीसह हातकणंगले लोकसभा मतदार संघासह चार विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत आ. कोरे यांची भूमीका महत्वाची ठरणारी आहे. सर्वपक्षीयांशी घरोब्याचा अनुभव पाठीशी असलेल्या माजी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी संघटनेची एकला चलोरे ही जुनी राजकीय वाटचाल आणि बदललेली राजकीय हवा शेट्टी यांना उभारी देईल काय ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
अंदाज बांधणे कठीण
मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरकरांनी प्रस्थापितांचा धक्का देण्याची आपली परंपरा कायम राखली. विधानसभेसाठी काँग्रेसने भोपळा फोडला तर भाजपला शुन्यावर ठेवले. शिवसेना सहावरुन एका जागेवर घसरली. राजू शेट्टी आणि धनंजय महाडिक या दिग्गजांचे पुन्हा दिल्लीचे स्वप्न भंगले. कोल्हापूकरांनी दोन अपक्षांना विधानसभेत पाठविले. राष्ट्रवादीचा दोन आमदारांचा कोटा कायम राखला. भाजपच्या प्रचारातील भगवा, हिंदुत्व, धर्म आदी मुद्दे या मतदारांना भुरळ घालू शकतात, मात्र विजयाचा गुलाल उधळण्यापर्यंत नेण्याची फेरमांडणी सुरू आहे. महाविकास आघाडीच्या साथीने शिंदे गटाला टार्गेट करत भाजपला विरोध हा एकच अजेंडा घेवून उध्दव ठाकरे यांची शिवसेना मैदानात उतरेल. महाविकास आघाडीसह शिवसेनेचा पारंपरिक मतदार आणि सहानुभुतीच्या लाटेवर स्वार असलेल्या उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मोठे आव्हान भाजप-शिंदे गटापुढे असेल. मैदान निश्चित आहे, उमेदवारांचे चेहरे ठरलेले आहेत. फक्त कोणकोणत्या झेंड्याखाली लढणार हे अनिश्चित आहे. यातच कोल्हापुरातील मागील काही वर्षातील परिवर्तनाचे राजकारण पाहता अंदाज बांधणे कठीण असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.